-
कल्याण, प्रतिनिधी
ऐन लक्ष्मी पूजनाच्या सायंकाळी आभाळात फटाक्यांची जोरदार आतषबाजी सुरू झाली. मंगळवारी संध्याकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोर वाढला आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरूवात झाली. पावसाने अनपेक्षित हजेरी लावल्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांचा उत्साह ओसरला, रांगोळ्या पुसल्या गेल्या, किल्ले, कंदील भिजले आणि फटाके फोडण्याचा आनंदही विरला गेला. बाजारात खरेदीसाठी आलेल्यांची एकच तारांबळ उडालेली दिसून आली. (Dombivli Rain)
(हेही वाचा – Donald Trump ज्याला व्हाईट हाऊसचा स्पेशल काऊंसिल बनवताहेत, तो निघाला…)
सकाळपासून सर्वत्र दिवाळी सणाच्या उत्साहाचे वातावरण होते. दिवाळीच्या निमित्ताने घराघरांत लगबग, सजावट, रांगोळ्या आणि दिव्यांनी उजळलेले अंगण अशी रंगत दिसत होती. संध्याकाळी लक्ष्मी पूजनाची तयारी सुरू असतानाच हवामानात अचानक बदल झाला विजांचा कडकडाट, थंड वातावरण पसरुन अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांचे नियोजन विस्कळीत झाले. कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रस्त्यावर पाणी साचले, बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्यांची त्रेधातिरपीट उडाली. अनेकांना खरेदी केलेले सामान घेऊन आसरा शोधावा लागला. रांगोळ्या, किल्ले, कंदील आणि सजावटीचे साहित्य भिजल्याने गृहिणींसह बच्चेकंपनीचाही हिरमोड झाला. (Dombivli Rain)
(हेही वाचा – Pune News : सार्वजनिक ठिकाणी नमाजपठणाला बंदी घाला; हिंदु जनजागृती समितीची मागणी)
अनेक ठिकाणी किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. दिवाळीची सुट्टी लागल्यापासून बच्चे कंपनीने किल्ले उभारणी केली आहे. मात्र पावसाने अचानक हजेरी लावल्यामुळे बच्चे कंपनीची सर्व मेहनत पाण्यात गेली. अनेकांनी तातडीने किल्ले झाकले. मात्र तोपर्यंत पावसाने किल्ले साफ धुतले होते. मे महिन्यापासून सर्वत्र पाऊस सुरू आहे. अधूनमधून तो कोसळत आहे. दिवाळीतही थांबण्याचे नाव घेत नाही. हवामान खात्याचे अंदाजही फोल ठरल्याचे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास कोसळू लागलेल्या पावसाने सिद्ध केले आहे. अवकाळी पावसामुळे काही परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. बत्ती गुल झाल्यामुळे गृहिणींना घरांमध्ये पणत्यांची संख्या वाढवावी लागली. दिवाळीच्या सणावर विरजण आणणाऱ्या पावसामुळे अबाल-वृद्धांनी नाराजी व्यक्त केली. रांगोळ्या पुसल्या, फटाके भिजले आणि सणाचा आनंदच पावसाने हिरावून घेतल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. मात्र पावसाच्या हजेरीला काहींनी सकारात्मक अभिप्राय दिला. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी निसर्गाचीही कृपा झाली, पावसाच्या रुपाने धनधान्याची बरसात झाल्याची प्रतिक्रिया काही वृद्ध नागरिकांनी दिल्या. (Dombivli Rain)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

