Kalyan-Dombivli : नालेसफाईच्या निविदांना उशीर; यंदाही पावसाळ्यापूर्वी कामे रखडण्याची चिन्हे?

74
Nala cleaning work in Kalyan-Dombivli area.
Kalyan-Dombivli : नालेसफाईच्या निविदांना उशीर; यंदाही पावसाळ्यापूर्वी कामे रखडण्याची चिन्हे?
  • कल्याण, प्रतिनिधी

Kalyan-Dombivli                कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्यावर्षी नालेसफाईला उशीर झाला होता. त्यातच पावसाळा लवकर सुरू झाला होता. यंदाही पावसाळा अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यापूर्वी केडीएमसी क्षेत्रातील नालेसफाईची कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र यंदा प्रशासनाने नालेसफाई कामाच्या निविदा उशिरा मागाविल्या आहेत. त्यामुळे यंदाही नालेसफाईच्या कामाला विलंबाने सुरूवात होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Kalyan-Dombivli)

कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागातील नाल्यांची सफाई पावसाळ्यापूर्वी करण्यासाठी दरवर्षी महानगरपालिका एप्रिल महिन्याच्या पंधरवड्या आधीच निविदा प्रक्रिया पूर्ण करत असते. त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात नालेसफाईच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होऊन एकूण एकूण तीन टप्प्यांत अर्थात जूनच्या पहिल्या आठवड्यात नालेसफाईचे काम संपत असते. (Kalyan-Dombivli)

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात ९७ किलोमीटर लांबीचे ९५ मोठे, तर ३५० किलोमीटर लांबीचे छोटे नाले (गटार) आहेत. त्याचप्रमाणे केडीएमसी क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या २७ गावांच्या परिक्षेत्रात २९ नाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून केडीएमसी प्रशासनाला ९५ नाल्यांच्या सफाई कामासाठी निविदा मागवाव्यात लागतात. निविदा मागविणे, त्या निविदांना मंजुरी देणे, कामाचे कार्यादेश काढणे या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच नालेसफाईच्या कामांना प्रत्यक्षात सुरूवात केली जाते. (Kalyan-Dombivli)

मंजुरीच्या किचकट प्रक्रियेमुळे विलंब

पावसाळा अवघ्या दीड महिन्यांवर येऊन ठेपला आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे सुरू करायची आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही परीस्थितीत ही कामे पूर्ण करावी लागणार आहेत. मात्र नालेसफाईच्या कामांसाठी मागविलेल्या निविदा अद्यापपर्यंत आयुक्तांकडे मंजुरीसाठी गेल्या नाहीत. आयुक्तांच्या मंजुरीनंतर स्थायी समिती किंवा महासभेच्या मंजुरीसाठी पाठविल्या जातील. मात्र या प्रक्रियेला नेहमी उशीर होत असतो, हा नेहमीचा अनुभव कल्याण-डोंबिवलीकरांना येत असतो. (Kalyan-Dombivli)

(हेही वाचा – Noida Violent Protests : राजदच्या नेत्यांचाही सहभाग; प्रियंका भारती आणि कंचना यादव यांच्याविरोधात तक्रार)

…अन्यथा कल्याण-डोंबिवलीत पाणी तुंबण्याची शक्यता

नालेसफाई कामाच्या निविदांना मंजुरी पुढील आठवड्यात मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर ठेकेदारांना कार्यादेश दिले जातील. यामध्ये १०-१५ दिवस गेल्यास एप्रिल महिना संपून जाईल. गेल्यावर्षी १० मे पासून पावसाळा सुरू झाला होता. त्यामुळे नालेसफाईची कामे अर्धवटच राहिली होती. यंदा देखील बदलते हवामान लक्षात घेता पावसाळा लवकर सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करणे प्रशासनापुढे मोठे आव्हान ठरणार आहे. एवढे करूनही नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण झाली नाही तर कचरा आणि गाळाने भरलेल्या नाल्यांमुळे पावसाळ्याच्या दिवसांत कल्याण-डोंबिवलीत जागोजागी पाणी तुंबण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Kalyan-Dombivli)

नालेसफाईची कामे वेळेत करण्याचे उद्दिष्ट्य – जगदीश कोरे

नालेसफाईसाठी यंदाच्या अंदाज पत्रकात ४ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्याच्या कामासाठी निविदा मागविल्या आहेत. त्या निविदा मंजुरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आल्या आहेत. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येतील. येत्या काही दिवसांत नालेसफाईची कामे सुरू होतील. प्रभाग निहाय ठेकेदाराची नेमणूक केली जाणार असल्याने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल, असा विश्वास अतिरिक्त शहर अभियंता जगदीश कोरे यांनी व्यक्त केला. (Kalyan-Dombivli)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.