-
प्रतिनिधी
वांद्रे येथील लिंकिन रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमा शोरूममध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेची अतिरिक्त आयुक्तांच्या पातळीवर सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री अॅड. आशिष शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहेत.
सोमवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास या शोरूममध्ये आग लागली. या आगीमुळे क्रोमा शोरूमचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आग लागल्याची माहिती मिळताच अॅड. शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधत परिस्थितीचा आढावा घेतला आणि तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : तुर्की पाकिस्तानला आधुनिक ड्रोन पुरवत आहे का? संरक्षण तज्ञ काय म्हणतात ?)
घटनास्थळी पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री अॅड. शेलार (Adv. Ashish Shelar) म्हणाले, “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी इमारतीचे आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.” या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी झाल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. विशेषतः या इमारतीच्या बांधकामात सहभागी असलेले माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळण्यासाठी सखोल चौकशी आवश्यक असल्याचे अॅड. शेलार यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, लवकरात लवकर याचे सत्य बाहेर यावे आणि जबाबदारी निश्चित व्हावी, अशी मागणी पालकमंत्री अॅड. शेलार (Adv. Ashish Shelar) यांनी केली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community