
Kalyan Fata Protest: कल्याण फाटा येथील दिवसेंदिवस गंभीर होत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर नागरिकांनी अखेर शांततापूर्ण पद्धतीने आवाज उठविला आहे. जनराज्य आणि कल्याणफाटा ट्रॅफिक अॅक्शन कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लेकार्ड अभियान राबवून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आंदोलन किंवा रस्ता रोको न करता नागरिकांनी हातात संदेशपर फलक घेत वाहतूक समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींनी ऐरोली – काटई नाका फ्रीवे (फेज १ व २) जुलै २०२६ पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच जुलै महिन्यात फ्रीवे सुरू होणार असल्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र जुलै संपल्यानंतरही प्रकल्प सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, त्यातूनच ता. १ ऑगस्ट रोजी जनजागृती अभियान हाती घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा – Shivsena धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी पुन्हा तहकूब; सर्वोच्च न्यायालयात आता ‘या’ दिवशी होणार पुढील सुनावणी
या अभियानादरम्यान कोणत्याही प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या नाहीत किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, असे कोणतेही कृत्य करण्यात आले नाही. नागरिकांनी केवळ प्लेकार्डच्या माध्यमातून कळ्याणफाटा परिसरातील वाहतूक कोंडीची भीषणता प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक वाहनचालकांनीही या उपक्रमाला प्रतिसाद देत समर्थन दर्शविल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.
आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाची पूर्वकल्पना पोलिसांना दिली नव्हती. पोलिसांनी सूचना केल्यानंतर आयोजकांनी त्यांना सहकार्य केले असून, भविष्यात अशा सार्वजनिक उपक्रमांसाठी आवश्यक ती पूर्वपरवानगी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या अभियानानंतर आमदार, वाहतूक पोलीस, नगरसेवक आणि स्थानिक सामाजिक संस्थांची संयुक्त बैठक पार पडली.
बैठकीनंतर राँग साईडने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई आणि बेकायदा अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू झाल्याचा दावा करण्यात आला. कळ्याणफाटा वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेपर्यंत सात प्रमुख मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार कळ्याणफाटा ट्रॅफिक अॅक्शन कमिटीने व्यक्त केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
