Chandrayaan 3 आम्हाला तुमचा अभिमान वाटतो!

102
  • सायली डिंगरे

चंद्रयान – ३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करुन इतिहास रचला. चंद्रावर लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला. या मोहिमेत इस्रोला नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीचेही सहकार्य लाभले. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या या मोहिमेच्या यशामागे अनेक वर्षांपासून काम करणारी इस्रोची टीम आहे. चंद्रयान – ३ मोहीम यशस्वी करण्यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे ३ वर्ष ९ महिने १४ दिवसांचे अथक परिश्रम आहेत. इस्रोप्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या टीमने आज हे यश मिळवले. ज्यांच्यामुळे आज जगभरात देशाचा गौरव होत आहे, त्या

शास्त्रज्ञांचा परिचय नक्कीच करून घ्यायला हवा!

चंद्रयान – ३ मध्ये वापरलेले बाहुबली रॉकेट डिजाइन करणारे डॉ. एस सोमनाथ!

डॉ. एस सोमनाथ इस्रोचे अध्यक्ष आहेत. त्यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. चंद्रयान – ३ मध्ये वापरण्यात आलेले बाहुबली रॉकेट त्यांनी डिजाइन केले होते. त्याच रॉकेटने चंद्रयान – 3 लाँच करण्यात आले. डॉ. एस. सोमनाथ यांचे शिक्षण बंगळुरुच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झाले आहे. डॉ. एस. सोमनाथ यांना गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जबाबदारी मिळाली होती. चंद्रयान -३ नंतर डॉ. एस सोमनाथ यांच्याकडे आदित्य एल – १ आणि गगनयान मोहिमेची जबाबदारी देण्यात येणार आहे.

चंद्रयान – ३ चे प्रोजेक्ट डायरेक्टर असलेले पी. वीरमुथुवेल!

तमिळनाडूच्या के. विल्लुपुरममध्ये राहणारे पी. वीरमुथुवेल या मोहिमेचे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. २०१९ मध्ये त्यांना चंद्रयान – 3 मोहिमेची जबाबदारी मिळाली. पी. वीरमुथुवेल या आधी इस्रोच्या मुख्य कार्यालयात स्पेस इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्रामचे उपसंचालक होते. चंद्रयान – २ मोहिमेमध्येही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी निभावली होती. त्यांचे शिक्षण आयआयटी मद्रासमध्ये झाले आहे.

रॉकेट निर्मितीची जबाबदारी असलेले एस. उन्नीकृष्णन नायर!

विक्रम साराभाई अवकाश केंद्राचे संचालक आणि एयरोस्पेस इंजीनियर डॉ. उन्नीकृष्णन यांच्याकडे चंद्रयान – ३ मोहिमेशी संबंधित अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या. त्यांच्या नेतृत्वाखाली केरळ येथील विक्रम साराभाई अवकाश केंद्राने जियोसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेईकल (जीएसएलवी) मार्क-III तयार केले आहे. डॉ. उन्नीकृष्णन यांचे शिक्षण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये झाले आहे. चंद्रयान – २ मोहिमेतही नायर सहभागी झाले होते.

(हेही वाचा Chandrayaan – 3 मोहिमेच्या यशानंतर इस्रोचे प्रमुख म्हणाले, विज्ञान आणि अध्यात्माचा शोध घेणे माझ्या जीवनाचा भाग)

इस्रोचे पॉवर हाऊस मानले जाणारे एम. शंकरन!

उपग्रहांवर जाणाऱ्या नवीन उर्जा प्रणाली आणि सौर अ‍ॅरे बनवण्याच्या कौशल्यामुळे एम. शंकरन यांना इस्रोचे पॉवरहाऊस मानले जाते. एम. शंकरन यांनी १९८६ साली तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विश्वविद्यालयातून फिजिक्समध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे. कम्युनिकेशन, नेविगेशन, रिमोट वर्किंग, हवामानाचा अंदाज आणि ग्रहांचा शोध घेण्याची जबाबदारी शंकरन यांच्या नेतृत्वाखाली होती. त्यांना उपग्रह बनवण्याचा ३ दशकांहून अधिक अनुभव आहे. चंद्रयान – १ , मंगळयान आणि चंद्रयान – २ या मोहिमांमध्येही त्यांचा सहभाग होता. चंद्रयान – ३ चे तापमान नियंत्रित ठेवणे, त्यांचे दायित्व होते. एम. शंकरन हे यू. आर. राव सॅटेलाइट सेंटरचे संचालक आहेत. या संस्थेकडे इस्रोचे उपग्रह तयार करण्याची जबाबदारी आहे.

चंद्रयान ३च्या उपसंचालक डॉ. के. कल्पना!

डॉ. के. कल्पना चंद्रयान ३ मोहिमेमध्ये उपसंचालक पदावर आहेत. ४ वर्षापासून त्या चंद्रयान मोहिमेवर काम करत आहेत.

चंद्रयान २ मध्येही सहभागी असलेल्या एम. वनिता

इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम इंजिनियर असलेल्या एम. वनिता या चंद्रयान २ मोहिमेच्या प्रकल्प संचालक होत्या. या निमित्ताने चंद्र मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला ठरल्या. चंद्रयान ३ मध्येही त्यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावले होते.

चंद्रयान – ३ चे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणाऱ्या ‘रॉकेट वुमन’ रितू करिधल श्रीवास्तव!

‘रॉकेट वुमन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंतराळशास्त्रज्ञ रितू करिधल श्रीवास्तव यांच्याकडे चंद्रयान चंद्रावर उतरवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्या मूळच्या उत्तरप्रदेशातील लखनौ येथील आहेत. त्यांनी लखनौ विद्यापीठातून भौतिकशास्त्रात एमएससी केले आहे. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये त्यांचे पुढील शिक्षण झाले आहे.
देशातील आघाडीच्या अवकाश शास्त्रज्ञांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. रितू ‘रॉकेट वुमन’ म्हणूनही ओळखल्या जातात. रितू करिधल यांनी मिशन मंगलयान आणि मिशन चंद्रयान -२ मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

चंद्रयान – ३ द्वारे भारताचा झेंडा चंद्रावर फडकल्यामुळे देशवासियांची छाती अभिमानाने फुलून आलेली असताना महाराष्ट्रातही आनंद व्यक्त केला जात आहे. चंद्रयान – ३ साठी योगदान देण्याची संधी महाराष्ट्राला मिळाली आहे. बुलढाण्यातील खामगावची चांदी, सांगलीत रॉकेटच्या पार्ट्सचे कोटिंगचे काम, वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीजमध्ये फ्लेक्स नोजल आणि बूस्टर चंद्रयान – ३ मध्ये वापरण्यात आले आहेत.

बुलढाण्यातील खामगावची चांदी आणि थर्मल फॅब्रिक्स

खामगाव ही देशाची रजतनगरी म्हणून ओळखली जाते. येथे शुद्ध चांदी मिळत असल्याने चंद्रयान – ३ मधील स्टर्लिंग ट्यूबमध्ये ही चांदी वापरण्यात आली आहे, अशी माहिती खामगावचे प्रसिद्ध चांदीचे व्यावसायिक श्रद्धा रिफायनरी यांनी दिली आहे. चंद्रयानला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आवश्यक असणारा रबराईज्ड फॅब्रिक ‘विकमशी फॅब्रिक्स’ने तयार केला आहे.

सांगलीत जीएसएलव्ही रॉकेटच्या पार्ट्सच्या कोटिंगचे काम

जीएसएलव्ही MK III रॉकेटच्या पार्ट्सचे महत्त्वपूर्ण कोटिंगचे काम सांगलीतील उद्योजक संदीप सोले यांच्या डॅझल डायनाकोट्स या फॅक्टरीत करण्यात आले आहे. गेली ३० वर्षे केवळ संरक्षण आणि अंतराळ संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम या कंपनीमध्ये करण्यात येत आहे. या जीएसएलव्ही यानाचा एक भाग सांगलीजवळील माधवनगरमध्ये असलेल्या डझल डायनाकोटस् या खासगी कारखान्यात तयार करण्यात आला आहे. अंतराळ यानाला प्रक्षेपणानंतर जे इंधन आवश्यक आहे, ते तयार करण्यात येणाऱ्या भागाला संरक्षण देणाऱ्या उपकरणाची निर्मिती या कारखान्यात करण्यात आली.

‘चंद्रयान-३’ मोहिमेत जुन्नरचा सहभाग

असिफभाई महालदार हे उद्योजक जुन्नर तालुक्यातील राजुरी येथील आहेत. त्यांची रिलायन्स फायर सिस्टीम ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीला या मोहिमेसाठी ६ कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले होते. चंद्रयान मोहिमेदरम्यान काही धोका झाला, तर मोठी आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठी यंत्रणा तैनात ठेवावी लागते. ही अग्निशामक यंत्रणा असिफभाई महालदार यांच्या रिलायन्स फायर सिस्टीम या कंपनीने पुरवली होती. राजुरी गावातील मयुरेश शेटे हे इस्त्रोत सिनियर सायंटिस्ट म्हणून काम करतात. त्यांचा चंद्रयान मोहिमेत मोठा सहभाग आहे. त्यांचे वडिल राजुरीत प्राचार्य आहेत आणि मयुरेश यांचे प्राथमिक शिक्षण राजुरीतील शिक्षण विद्या विकास मंदिर येथे झाले आहे.

वालचंद इंडस्ट्रीजचे योगदान

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीजमध्ये चंद्रयानाला लागणारे बूस्टर आणि फ्लेक्स नोजल बनवण्यात आले आहेत. भारताने आजपर्यंत अनेक अवकाश मोहिमा केल्या आहेत. त्यासाठीचे हार्डवेअर बनवण्यात वालचंद इंडस्ट्रीचा मोठा वाटा आहे. वालचंद इंडस्ट्रीज आणि इस्रो गेली ५० वर्ष एकत्र काम करीत आहेत. चंद्रयान-१, चंद्रयान-२ आणि आता चंद्रयान-३ मिशनच्या LVM3 प्रक्षेपण वाहनामध्ये वापरलेले बूस्टर सेगमेंट S200 हेड, एंड सेगमेंट, मिडल सेगमेंट आणि ३.२ मीटर व्यासाचे नोजल एंड सेगमेंट वालचंद इंडस्ट्रीजमध्ये तयार केले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.