Thane मध्ये बुलडोझर पॅटर्न; बेकायदेशीर पब-बारवर धडक कारवाई

Thane येथील शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या एकूण 31 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या, तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून 8 ठिकाणी तर 9 व शेडवर कारवाई करण्यात आली.

141
Thane मध्ये बुलडोझर पॅटर्न; बेकायदेशीर पब-बारवर धडक कारवाई
Thane मध्ये बुलडोझर पॅटर्न; बेकायदेशीर पब-बारवर धडक कारवाई

संपूर्ण महाराष्ट्र अमली पदार्थ मुक्त व्हावा, असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी घेतला असून याबाबत ठोस कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील पब, बार व अंमली पदार्थ विक्री करणारी अवैध बांधकामे निष्कसित करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. या कारवाईत महापालिका कार्यक्षेत्रातील शाळा, महाविद्यालयापासून 100 मीटर अंतराच्या आत असलेल्या एकूण 31 पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या, तर हॉटेल, पब्ज, बार असे मिळून 8 ठिकाणी तर 9 व शेडवर कारवाई करण्यात आली.

(हेही वाचा – Banganga Lake Damage : कंत्राटदाराविरोधात कडक कारवाई करण्याच्या महानगरपालिका आयुक्तांच्या सूचना)

मुख्यमंत्र्यांच्या धडक कारवाईच्या सूचना

पुणे शहरामध्ये तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेल्याची प्रकरणे समोर येत आहेत. अशा प्रकारचे गैरप्रकार राज्यातील कुठल्याही शहरात घडू नयेत, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कठोर निर्णय घेवून राज्यात सर्व शहरातील अनधिकृत पब्ज, बार व अनधिकृत अमली पदार्थ विक्री केंद्रे नष्ट करावीत अशा सूचना दिल्या आहेत, याची सर्वत्र अंमलबजावणी सुरु आहे. ठाण्यात देखील प्रभागसमितीनिहाय असलेल्या पब्ज, बार आदींवर धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त सौरभ राव यांनी दिले असून त्यानुसार प्रभागसमितीस्तरावर अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त तसेच सहायक आयुक्तांच्या उपस्थितीत व पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरू करण्यात आली.

वागळे प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पंचशील बार, इंडियन स्वाद बार, अनधिकृत पानटपरी, गुटखा विक्रेते यांचेवर कारवाई करण्यात आली. वर्तकनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात असलेल्या द सिक्रेट बार व हुक्का पार्लर, तसेच कोठारी कंपाऊंड येथे असलेल्या पब, बारवर कारवाई करण्यात आली. याच परिसरातील सोशल हाऊस पब येथील अनधिकृत बांधकाम व अवैध पानटपऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

लोकमान्य सावरकरनगर प्रभागसमिती अंतर्गत ज्ञानेश्वरनगर राजश्री शाहू महाराज विद्यालय येथील 100 मीटर परिसरात असलेल्या तीन टपऱ्या सील करण्यात आल्या, तसेच सावरकरनगर येथील ज्ञानोदय विद्यालय येथील एक पानटपरी जप्त करण्यात आली. उथळसर प्रभाग समितीतील अनाधिकृत हॉटेल, हुक्का पार्लरवर कारवाई करण्यात आली, तर राबोडी येथील के.व्हिला शाळेपासून 100 मीटरच्या आतील पानटपऱ्या हटविण्याची कारवाई करण्यात आली.

पोकलेन मशीनच्या साहाय्याने बांधकाम जमीनदोस्त

माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत घोडबंदर रोड येथील खुशी लेडीज बार व ओवळा येथील मयुरी लेडीज बारवर कारवाई करण्यात आली असून पोकलेन मशीनच्या सहाय्याने संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. तसेच चितळसर मानपाडा, सिनेवंडर परिसरातील अनधिकृत बार, कापूरबावडी येथील स्वागत बारवर देखील कारवाई करण्यात आली. तसेच ए.पी.शहा कॉलेजजवळील अनधिकृत दिव्यांग स्टॉलची तपासणी करून ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले ते स्टॉल जप्त करण्यात आले.

नौपाडा कोपरी प्रभागसमिती अंतर्गत असलेल्या अनधिकृत हॉटेल, बारचे बांधकाम देखील जमीनदोस्त करण्यात आले. कोपरी परिसरात दिव्यांग व्यक्तींना देण्यात आलेले स्टॉल तसेच अनधिकृत स्टॉल यांची तपासणी करुन ज्या ठिकाणी धुम्रपान निषेध पदार्थ आढळून आले त्या ठिकाणचे स्टॉल सीलबंद करण्यात कारवाई करण्यात आली. या ठिकाणची पाच दुकाने सील करण्यात आली आहेत.

कळवा प्रभाग समितीमधील शाळा परिसरालगत 100 मीटरच्या आत असलेल्या पानटपऱ्यांवर तसेच अनधिकृत बार यांच्यावर कारवाई करण्यात आली. दिवा प्रभागसमिती अंतर्गत संपूर्ण विभागाचा सर्व्हे करुन शाळांपासून 100 मीटर परिसरात असलेल्या पानटपऱ्या तसेच अनधिकृत हॉटेल, बार यांच्यावर ठोस कारवाई करण्यात आली.

प्रभाग समितीनिहाय करण्यात आलेली कारवाई अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ 1 चे उपायुक्त मनिष जोशी, परिमंडळ 2 चे उपायुक्त शंकर पाटोळे, परिमंडळ 3 चे उपायुक्त दिनेश तायडे, तसेच पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव, सहपोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या बंदोबस्तात, महापालिकेच्या सर्व प्रभागसमितीचे सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

महापालिका कार्यक्षेत्रातील अनधिकृत हॉटेल, पब्ज, बार तसेच पानटपऱ्या पूर्णपणे निष्कसित होईपर्यत ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांनी दिली. (Thane)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.