Assembly Election च्या काळात सर्व तपास व अंमलबजावणी यंत्रणा सजग, संशयास्पद प्रकरणी थेट जप्तीची कारवाई

301
Assembly Election च्या काळात सर्व तपास व अंमलबजावणी यंत्रणा सजग, संशयास्पद प्रकरणी थेट जप्तीची कारवाई
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका (मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा) हद्दीत कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक प्रकरणांशी संबंधित सर्व तपास व अंमलबजावणी यंत्रणांनी अधिक चोखपणे जबाबदारी पार पाडावी. पैशांची देवाणघेवाण, मादक द्रव्य, मद्य विक्री व तस्करी, सोने-चांदींची विक्री आणि तस्करी तसेच हवाला आदी संशयास्पद प्रकरणात कारवाई करण्यात कोणतीही हयगय करू नये. संशयास्पद प्रकरणी थेट व तात्काळ जप्तीची कारवाई करावी. तसेच आर्थिक खर्चाच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या मतदारसंघांवर अधिक लक्ष केंद्रीत करुन तेथेही योग्य ती कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणूक अनुषंगाने, मुंबईतील कायदा व सुव्यवस्था तसेच आर्थिक प्रकरणांशी संबंधित विविध तपास व अंमलबजावणी यंत्रणांची महानगरपालिका मुख्यालयात  २२ ऑक्टोबर २०२४) बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. (Assembly Election)
अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त  आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशासन) डॉ. आरती सिंह, सह पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सत्या नारायण, महानगरपालिकेचे विशेष कार्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार आदी यावेळी उपस्थित होते. (Assembly Election)
आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क, सक्तवसूली व अंमलबजावणी, महसूल गुप्तवार्ता, केंद्रीय वस्तू व सेवा कर, राज्य वस्तू व सेवा कर, वस्तू व सेवा कर गुप्तवार्ता, सीमा शुल्क, राज्यस्तरीय बँकर्स समिती, अंमली पदार्थ नियंत्रण, वित्तीय गुप्तवार्ता विभाग; रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तटरक्षक दल, रेल्वे सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारतीय विमानतळ प्राधिकरण, नागरी उड्डाण सुरक्षा, परिवहन विभाग, आचारसंहिता कक्ष, मुंबई पोलिस दलाचे कायदा व सुव्यवस्था विभाग यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. (Assembly Election)
बैठकीच्या सुरुवातीला सर्व यंत्रणांकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले नियोजन तसेच सुरू असलेल्या कार्यवाहींचा जिल्हा निवडणूक अधिकारी  भूषण गगराणी यांनी आढावा घेतला. त्यानंतर सर्व यंत्रणांच्या प्रतिनिधींना संबोधित करताना ते म्हणाले, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ मध्ये आलेल्या काही अनुभवांच्या आधारे, माननीय केंद्रीय निवडणूक आयोग तसेच  राज्य निवडणूक आयोग मुंबईतील निवडणुकीशी संबंधित बारीकसारिक बाबींवर विशेष लक्ष ठेवून आहे. त्यामुळे, मुंबईत कार्यरत असलेल्या प्रत्येक यंत्रणांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ दरम्यान अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे. सर्व यंत्रणांचे आपापसांमध्ये योग्य समन्वय राहावे, यासाठी प्रत्येक यंत्रणेने समन्वयक अधिकाऱ्याची (नोडल ऑफिसर) नियुक्ती करावी. पैशांची देवाणघेवाण, मादक द्रव्य, मद्य विक्री व तस्करी, सोने-चांदींची विक्री आणि तस्करी तसेच हवालांशी संबंधित घडामोडींवर अधिक बारकाईने आणि गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक यंत्रणेने अधिक सक्रिय होऊन अशा संशयास्पद प्रकरणांत कारवाई करण्यात कोणतीही कसूर ठेवू नये. प्रसंगी जप्तीची कारवाई करावी, असे निर्देशही गगराणी यांनी दिले. (Assembly Election)
गगराणी पुढे म्हणाले, संबंधित यंत्रणांनी संयुक्त पथकांची निर्मिती करून त्यांची मुंबईतील ‘चेक पोस्ट’वर नियुक्ती करावी. समन्वयक अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील माहितीची नियमितपणे देवाणघेवाण करावी, जेणेकरुन समन्वयाने कारवाई करता येईल. मुंबईच्या सीमेवर, बंदरांवर, समुद्र किनाऱ्यांवर, विमानतळ तसेच वाहतुकीच्या अन्य संसाधनाद्वारे केल्या जाणाऱ्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून संशयास्पद प्रकरणांमध्ये तात्काळ कारवाई करावी. मद्य विक्री करणाऱ्या दुकानांबाबत दक्ष राहावे तसेच त्याठिकाणी काही गैरव्यवहार आढळून आल्यास त्यावर तात्काळ कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. (Assembly Election)
मुंबईतील विविध ठिकाणांहून जाणाऱ्या ‘नॉन शेड्यूल्ड फ्लाईट्स’ संदर्भातील माहिती भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मुंबई पोलिस तसेच आयकर विभागाला नियमितपणे द्यावी. तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करावे, असेही  गगराणी यांनी सांगितले.  दरम्यान, आर्थिक खर्चाच्या बाबतीत काही मतदारसंघ अत्यंत संवेदनशील आहेत. त्याठिकाणी  निवडणुकीच्या काळात पैशांचा व्यवहार होणार नाही तसेच अशा संवेदनशील मतदारसंघांमध्ये होणारी पैशांची देवाणघेवाण, व्यवहार किंवा अन्य कोणत्याही संशयास्पद वित्तीय बाबींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवून संबंधित यंत्रणांनी तात्काळ कारवाई करावी, असे निर्देशही  गगराणी यांनी दिले. (Assembly Election)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.