मुंबईत आता भर पावसातही भरले जाणार खड्डे, रिऍक्टीव्ह अस्फाल्ट तंत्राचा वापर करणार महापालिका

169

मुंबईत पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डयांची समस्या मोठ्याप्रमाणात वाढून काही अपघात होण्याचे प्रकार घडतात. यामुळे महापालिकेला टिकेचे धनी व्हावे लागत असून राज्यात आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे महापालिकेने यंदा रस्त्यांवर खड्डे पडणार नाही याची विशेष काळजी घेतली जात असून जेट पॅचर, वंडर पॅच, कार्बनकोर,कोल्डमिक्स, हॉटमिक्सनंतर प्रतिक्रीयाशील अर्थात रिऍक्टीव्ह अस्फाल्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्राद्वारे भर पावसातही खड्डे बुजवता येणार असून बुजवलेले खड्डे तीन वर्षे टिकतील अशाप्रकारचे हे तंत्र असल्याचे बोलले जात आहे.

( हेही वाचा : ट्विटर अकाऊंट हॅण्डल कोण करते; अमृता फडणवीसांनी केला खुलासा )

मुंबईत मोठ्या रस्त्यावर पावसाळ्यात खड्डे पडत असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पावसाळ्यात दरवर्षी खड्डे भरण्याची कामे केली जातात. पावसाळ्यात खड्डयांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून मान्सूनपूर्व सुरक्षात्मक उपाय म्हणून रस्त्यांच्या ठराविक ठिकाणांची पाहणी करुन मान्सूनपूर्व तयारी रस्ते विभागातर्फे केली जातात. यासाठी महापालिकेच्यावतीने परिमंडळ निहाय कंत्राटदार नियुक्त करून त्या हद्दीतील रस्त्यांवर पडणाऱ्या खड्डयांची आकस्मित कामे करून घेतली जातात.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे हे विभाग कार्यालयाकडून पारंपारिक पद्धतीने भरले जात असले तरीही मुसळधार पावसातही पुन्हा खड्डे पडण्याचे प्रकार घडत असतात. यासंदर्भात रस्ते विभागाकडे समाज माध्यमातून येणाऱ्या तक्रारीनुसा हे खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले जाते, परंतु अनेकदा अति तातडीच्या प्रसंगी पावसातही खड्डे बुजवावे लागत असल्याने अशाप्रकारे बुजवलेले खड्डे एक ते दोन पावसात वाहून जातात आणि पुन्हा खड्डयांची साम्राज्य पसरले जाते.

त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी प्रतिक्रीयाशील डांबर तंत्रज्ञान अर्थात रिऍक्टीव्ह अस्फाल्टचा वापर करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाने घेतला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे पावसाळ्यात पाऊस सुरु असतानाही रस्त्यांवरील खड्डे तातडीने भरण्याकरीता उपयोगी ठरणार आहे. पावसाळयापूर्वी, पावसाळ्यामध्ये आणि पावसाळयानंतरही या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरण्याची कामे या तंत्रज्ञानाद्वारे केली जाणार आहे.

त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पाऊस सुरु असतानाही खड्डे बुजवले जाणार असून यासाठी इको ग्रीन इन्फ्रस्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यासाठी दोन कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. हे खड्डे भरल्यानंतर याचा हमी कालावधी ३ वर्षांचा आहे. त्यामुळे या तंत्राचा वापर करून बुजवलेले खड्डे हे पावसाळ्यात वाहून जाणार नाही, त्यामुळे या तंत्राद्वारे टिकावू खड्डे बनवले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.