महापालिकेच्या कचऱ्याची हेल्पलाईन मुख्यमंत्र्यांमुळे दोन दिवस उशीरा झाली सुरू; नावही बदलले हेल्पलाईनचे

204
महापालिकेच्या कचऱ्याची हेल्पलाईन मुख्यमंत्र्यांमुळे दोन दिवस उशीरा झाली सुरू; नावही बदलले हेल्पलाईनचे
महापालिकेच्या कचऱ्याची हेल्पलाईन मुख्यमंत्र्यांमुळे दोन दिवस उशीरा झाली सुरू; नावही बदलले हेल्पलाईनचे

नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन’ (8169681697)चा शुभारंभ बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. हा क्रमांक मागील सोमवारी कार्यन्वित होणार होता. परंतु मुख्यमंत्र्यांनी या हेल्पलाईनचा शुभारंभ करण्याचा हट्ट धरल्याने अखेर ही हेल्पलाईन दोन दिवस उशीराने सुरू झाली आहे. या हेल्पलाईन शुभारंभ प्रसंगी बोलताना, मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महापालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते स्वच्छ, कचरामुक्त करावेत, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

वर्षा निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास राज्याचे बंदरे विकास व खनीकर्म मंत्री दादा भुसे, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, संचालक (माहिती व तंत्रज्ञान) शरद उघडे, प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे आदी यावेळी उपस्थित होते.

मुंबईतील सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदवता यावी, यासाठी महानगरपालिकेने ८१६९६८१६९७ हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे कचऱ्या संदर्भातील तक्रारींच्या निर्मुलनाकरीता एक थेट व्यासपीठ या क्रमांकाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार ५ जून २०२३ पासून ही सेवा कार्यान्वित होणार होती. परंतु दोन दिवस लांबणीवर ही हेल्पलाईन पडली असून बुधवारी याचा शुभारंभ करताना या व्हॉट्सॲप चॅटबॉटचे नाव बदलून मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’असे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, रस्त्यालगत असलेला कचरा, डेब्रिज उचलण्यासाठी मुंबईकरांना संपर्क क्रमांक करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार आजपासून ८१६९६८१६९७ या व्हॉट्सॲप क्रमांकाच्या ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’ वर मुंबईकरांना तक्रार नोंदविता येणार आहे. या क्रमांकावर नागरिकांनी कचरा, डेब्रिज बाबत तक्रार नोंदविल्यानंतर आठ तासात त्यावर कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रणालीसाठी महापालिकेने ३५० कनिष्ठ अवेक्षक (ज्युनिअर ओरशिअर) यांची नेमणूक केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून मुंबईकरांना दिलासा देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाने करावा, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

(हेही वाचा – IAS officers transfer : दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या; राजगोपाल देवरांकडे महसूल, तर असीम कुमार गुप्ता यांच्याकडे नगरविकास विभागाची जबाबदारी)

मुंबईतील रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत असून त्यामाध्यमातून खड्डेमुक्त मुंबई संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यात येत आहे. मुंबईत सुशोभिकरणाचे ११५० प्रकल्प सुरू असून त्याचे दृष्यस्वरुपात बदल दिसत आहेत. रोषणाई करण्यात आली असून समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेची मोहिम हाती घेण्यात आली आहे.

अशी आहे ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन’ सुविधा

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात, सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याच्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना थेट नोंदवता यावी, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉट्सॲप हेल्पलाईन’ कार्यान्वित झाली आहे. नागरिकांना ८१६९६८१६९७ या हेल्पलाईन क्रमांकावर घनकचरा तसेच बांधकाम राडारोडा (डेब्रीज) विषयक तक्रारी नोंदविता येतील. महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाने नागरिकांच्या सुविधेसाठी कचऱ्याशी संबंधित तक्रारी नोंदवण्यासाठी कार्यपद्धती सुनिश्चित केली आहे.

भ्रमणध्वनी वापरकर्त्यांकडून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून ही अद्ययावत, सहजसोपी अशी हेल्पलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. तक्रारीसंबंधीचे छायाचित्र व ठिकाण हे जीपीएस लोकेशन आदी शेअर केल्यानंतर ही तक्रार हेल्पलाईनमध्ये नोंदवली जाईल. यानंतर, ती थेट संबंधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन संबंधित अधिकारी तथा कर्मचारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मूलन करुन, त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना त्वरित तक्रार निर्मूलन केल्याचे प्रमाण मिळणार आहे.

घनकचरा व डेब्रीज वगळता इतर तक्रारी, सूचना या हेल्पलाईनमध्ये नोंदवता येणार नाहीत, तसेच हेल्पलाईन व्हॉटस्ऍप स्वरुपातील असल्याने त्यावर बोलण्याची / संभाषणाची सुविधा नसेल. या हेल्पलाईनच्या माध्यमातून नागरिकांना थेट तक्रार, सूचना नोंदवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दररोज वॉर्ड अधिकारी या तक्रारींवर संनियंत्रण करतील. दर आठवड्याला आयुक्त तक्रार निराकरणाचा आढावा घेतील.

नालेसफाई बाबत तक्रारीसाठी मुंबई महापालिकेने संपर्क क्रमांक यंत्रणा उपलब्ध करून दिली असून १५ जूनपर्यंत तक्रारी स्विकारण्यात येणार आहेत. १ ते ५ जून दरम्यान १०२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ८९ तक्रारींचे निराकरण केल्याचे महापालिका आयुक्त चहल यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.