BMC : श्रावण हर्डीकरांनी स्वीकारला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने सह आयुक्त (सामान्य प्रशासन)  मिलिन सावंत यांनी हर्डीकर यांचे स्वागत केले.

266
श्रावण हर्डीकरांनी स्वीकारला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार
श्रावण हर्डीकरांनी स्वीकारला महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई महानगरपालिकेचे BMC अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून श्रावण हर्डीकर यांनी बुधवारी, ३ मे २०२३ रोजी सकाळी पदभार स्वीकारला. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. संजीव कुमार (पश्चिम उपनगरे) यांच्याकडून हर्डीकर यांनी पदभार स्वीकारला.

मुंबई महानगरपालिका BMC प्रशासनाच्या वतीने सह आयुक्त (सामान्य प्रशासन)  मिलिन सावंत यांनी हर्डीकर यांचे स्वागत केले. यावेळी उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे, उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. हर्डीकर हे भारतीय प्रशासन सेवेतील २००५ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. पुणे येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी. इ. इन्स्ट्रूमेंटेमेशन ही पदवी त्यांनी संपादीत केली. सन २००४ मध्ये त्यांची भारतीय राजस्व सेवेत निवड झाली, त्यानंतर सन २००५ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत ते संपूर्ण भारतातून सातव्या क्रमांकाने तर महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

प्रशासकीय सेवेच्या प्रारंभी हर्डीकर यांनी कोल्हापूरचे सहायक जिल्हाधिकारी, दापोली (रत्नागिरी) चे सहायक जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावली. त्यानंतर नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. तसेच यवतमाळचे जिल्हाधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर जबाबदारी सांभाळल्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त, पिंपरी-चिचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी कामकाज करताना विशेष ठसा उमटविला. त्यानंतर ते नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक म्हणून  कार्यरत होते.

आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. सन २०११-१२ मध्ये राज्य शासनाकडून ‘सर्वोत्तम जिल्हाधिकारी’ या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा, निवृत्तीवेतन आणि तक्रार निवारण विभागाकडून उत्कृष्टरित्या नागरी सेवा पुरविल्याबददल त्यांना राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पदक बहाल करण्यात आले. नागरी वाहतूक नियोजन क्षेत्रात हर्डीकर यांनी राबवलेल्या प्रकल्पाला उत्कृष्ट प्रकल्प म्हणून केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी मंत्रालय व जागतिक बँक यांनी २०१६ मध्ये पुरस्कार प्रदान केला. लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकादमी (मसूरी) येथे प्रशिक्षण घेत असताना उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना रिना स्मृती सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. तसेच सन २०१९ मध्ये त्यांचा पिंपरी चिंचवड समाजभूषण पुरस्कारानेदेखील गौरव करण्यात आला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.