BMC : पूरपरिस्थितीचा सामना करण्याची महानगरपालिकेसह मुंबईतील सर्व यंत्रणांचे योगदान महत्वाचे

अतिवृष्टीच्या काळात पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप हे शहर आणि उपनगरात ४८० ठिकाणी लावण्यात येणार आहेत.

138

पर्यावरणीय बदलांमुळे प्रत्येक ऋतूवर या बदलांचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळेच मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात पूरपरिस्थितीच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज रहावे. पूरपरिस्थितीचा सामना करण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेसह मुंबईतील सर्व यंत्रणांनी पावसाळ्याच्या कालावधीत योग्य पद्धतीने योगदान दिल्यास शहरावर येणारे संकट एकत्रित प्रयत्नाने टाळता येते. मुंबईसारख्या मेगासिटीमध्ये पूराचा धोका टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी यंदा पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सर्व यंत्रणांना केले. महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या मान्सूनपूर्व – २०२३ आढावा बैठकीत सर्व यंत्रणांनी पावसाळ्यातील पूराच्या आव्हानासाठी सज्ज रहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील विविध यंत्रणांमध्ये सुयोग्य समन्वय साधला जाण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त  इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)  पी. वेलरासू,  बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक  लोकेश चंद्र,  मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,  मुंबई वाहतूक पोलीस सह आयुक्त प्रवीण पडवळ,  प्रभारी अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे)  रमेश पवार, सामान्य प्रशासन विभागाचे सह आयुक्त मिलिन सावंत, महानगरपालिका आयुक्त कार्यालयाचे सह आयुक्त  चंद्रशेखर चोरे,  हे उपस्थित होते. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांनी संगणकीय सादरीकरण केले. मुंबई महानगरपालिका आयुक्त कार्यालयात आयोजित मध्य व पश्चिम रेल्वे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद प्राधिकरण, भारतीय हवामान खाते, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, म्हाडा, मुंबई मेट्रो, राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम खाते, बेस्ट, विविध विद्युत वितरण कंपन्यांच्या प्रतिनिधींसह विविध संस्थांचे प्रतिनिधी हजर होते. त्याचबरोबर महानगरपालिकेचे संबंधित सह आयुक्त, उप आयुक्त, सहाय्यक आयुक्त व विविध खात्यांचे प्रमुख या बैठकीला उपस्थित होते.

(हेही वाचा BMC : मुंबईतील ९ मीटरपर्यंतच्या रस्त्यांची जबाबदारी विभागाच्या सहायक आयुक्तांची)

रेल्वे आणि महानगरपालिकेने गतवर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम समन्वय साधून काम केल्यानेच उपनगरीय लोकल सेवा अव्याहतपणे सुरू होती. रेल्वे हद्दीमध्ये मायक्रो टनेलिंग आणि कलव्हर्टच्या सफाईची कामे चांगली झाल्यानेच हे शक्य झाले. त्याचबरोबर पावसाच्या पाण्याचा संथ गतीने निचरा होणाऱ्या ठिकाणी भूमीगत जल – साठवण टाक्यांची उभारणी केली. त्यामुळे या ठिकाणी रेल्वे आणि रस्ते वाहतूक थांबली नाही. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम समन्वयाने काम करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या.

नागरिकांना मिळणार हवामानाशी संबंधित एसएमएस अलर्ट 

आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून यंदाच्या पावसाळ्याच्या कालावधीसाठी नियंत्रण कक्ष तसेच हवामानाचे वेळोवेळी अलर्ट देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. विभागीय पातळीवर आपत्कालीन परिस्थितीत निधी उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत वेळोवेळी अपडेट्स देणारी मॅसेजची यंत्रणा यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एखाद्या ठराविक भागासाठी हवामानाशी संबंधित अपडेट्स देणारी ही यंत्रणा आहे. त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांना एसएमएस उपलब्ध होणे शक्य होणार आहे. एका एसएमएस ॲपच्या सहाय्याने हे एसएमएस अलर्ट नागरिकांना पाठवण्यात येतील.

मुंबईत पावसाचे पाणी उपसा करणारे ४८० पंप

अतिवृष्टीच्या काळात पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप हे शहर आणि उपनगरात ४८० ठिकाणी लावण्यात येणार आहेत. तसेच या पंपांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे संनियंत्रण असणार आहे. महानगरपालिका आयुक्त चहल यांनी पंप ऑपरेटिंगची जबाबदारी असणाऱ्या संबंधितांची यादी सार्वजनिकरित्या जाहीर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्या. तसेच पाणी साचण्याच्या परिस्थितीत पंप योग्य पद्धतीने काम करतील याची पूर्वतयारी म्हणून मॉक ड्रिल करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. एखादा पंप जर वेळेत व योग्य प्रकारे कार्यरत झाला नाही, तर संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त चहल यांनी दिले.

(हेही वाचा BMC : अतिधोकादायक इमारतींचा वीज पुरवठा खंडित करा)

साथीच्या आजारांसाठी ३ हजार रुग्णशय्या

आगामी पावसाळी आजारांसाठीची तयारी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ३ हजार रूग्णशय्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यासोबतच पाण्यामुळे होणाऱ्या आजारांसाठी नमुने घेण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हिवताप (मलेरिया), डेंग्यू नियंत्रणासाठीची बैठक नुकतीच पार पडली असून जनजागृतीसाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.