उर्दू भाषिक भवनाच्या बांधकामाला प्रशासकांची मंजुरी: कंत्राटदाराची नियुक्ती

97
भायखळ्यात उभारण्यात येणाऱ्या उर्दू भाषिक भवनाची जोरदार चर्चा असतानाच आता या उर्दू भाषिक अध्ययन केंद्राच्या बांधकामाला प्रशासकांनी मान्यता दिली आहे. तब्बल १२ कोटी रुपये खर्च करून या केंद्राचे बांधकाम केले जाणार आहे. पाच मजली केंद्राच्या या बांधकामासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असून या प्रस्तावाला स्थायी समिती आणि महापालिका सभागृहाचीही अत्यंत तातडीने प्रशासकांनी मंजुरी दिली असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या माध्यमातून भायखळा येथील एका भूखंडावर उर्दू भाषा शिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा करत तत्कालिन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी चालू अर्थसंकल्पाला स्थायी समितीत मंजुरी देताना यासाठी निधीची तरतूद केली होती. त्यानुसार नगर अभियंता विभागाच्या माध्यमातून याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. महापालिकेच्या माध्यमातून या बांधकामासाठी सल्लागार म्हणून पेडणेकर अँड असोशिएट्स यांची नियुक्ती केली. सल्लागाराने बनवलेल्या आराखड्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून निविदा मागवली. त्यामध्ये कुवाला कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली असून, या कंपनीला १३.८० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. तळ अधिक पाच मजल्याची ही इमारत असून याचा प्रस्ताव अत्यंत तातडीने नगर अभियंता विभागाने प्रशासकांना सादर केल्यानंतर याला स्थायी समिती व प्रशासकांची मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.
( हेही वाचा: ‘बेस्ट’ बस थांब्यांजवळ प्रवाशांना मिळणार ‘इलेक्ट्रिक बाईक’ सेवा; वर्षभरात १ हजार दुचाकी सेवेत येणार )

उर्दू भाषिक शिक्षण केंद्र बनवण्याच्या या मुद्द्यावरून भाजपने तीव्र आक्षेप नोंदवला होता. ज्यामुळे हा मुद्दा टीकेचा विषय बनला होता. शिवसेना आणि यशवंत जाधव यांच्यावर याबाबत जोरदार टीका झाली होती. पण आता यशवंत जाधव हे शिंदे गटात असून भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे. परंतु त्यांच्याच काळात हा प्रस्ताव अत्यंत घाईघाईत प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी स्थायी समिती व सभागृह या दोहोंची मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. नगर अभियंता विभागानेही याला दुजोरा दिला असून, या विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या बांधकामाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आता याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे सांगितले. त्यामुळे आधी विरोध करण्याऱ्या भाजपची भूमिका आता काय राहील याकडे सर्वांचे लक्ष आहे.

कसे असणार बांधकाम?

  •  तळ अधिक पाच मजल्यांची इमारत
  • तळमजल्यावर वाहनतळ
  • पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर सभागृह
  • तिसऱ्या मजल्यावर वाचनालय
  • चौथ्या मजल्यावर वर्ग खोल्या
  • पाचव्या मजल्यावर प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी खोल्या
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.