Bisleri Water Contamination : बिस्लरीच्या पाण्यात पुन्हा आढळले जीवाणू, FSSAI ची धडक कारवाई सुरू!

जुलै २०२६ मध्ये पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील तेलीपारा गावात असलेल्या बिस्लेरीच्या उत्पादन प्रकल्पातून हा नमुना गोळा करण्यात आला होता

1
Bisleri FSSAI
  • ऋजुता लुकतुके

Bisleri Water Contamination :  देशातील सर्वाधिक लोकप्रिय बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडपैकी एक असलेल्या बिस्लेरीच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) पश्चिम बंगालमधील बिस्लेरीच्या उत्पादन प्रकल्पातून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यात कोलिफॉर्म (Coliform) जीवाणू आढळल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, अपीलनंतर प्राथमिक प्रयोगशाळेसोबतच तपासणी करणाऱ्या संदर्भ प्रयोगशाळेनेही या नमुन्यात जीवाणूंची उपस्थिती निश्चित केली आहे. त्यामुळे संबंधित उत्पादनाच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै २०२६ मध्ये पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी जिल्ह्यातील तेलीपारा गावात असलेल्या बिस्लेरीच्या उत्पादन प्रकल्पातून हा नमुना गोळा करण्यात आला होता. हा नमुना २० जुलैला उत्पादित करण्यात आलेल्या बॅच क्रमांक PB 201 मधील होता. या उत्पादनाची वापरण्याची अंतिम तारीख १९ जानेवारी २०२७ होती. (Bisleri Water Contamination)

हेही वाचा: “Sharad Pawar यांनी राज्यसभेवर पाठवताना काँग्रेसने सोडली होती स्वतःची जागा”; परिसीमनाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीला खडेबोल!

प्रयोगशाळेच्या तपासणीत या पाण्यात कोलिफॉर्म जीवाणू आढळले. त्यानंतर अन्न सुरक्षा नियामकाने १२ ऑगस्टला या विशिष्ट बॅचच्या विक्रीवर बंदी घातली. तसेच बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. अन्न सुरक्षा आणि मानक कायदा २००६ अंतर्गत कंपनीवर कारवाईची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

बिस्लेरीसाठी हा एकमेव अडचणीचा विषय नाही. यापूर्वी गोव्यातील उत्पादन प्रकल्पातून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यातही FSSAI ला निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ब्रोमेट आढळले होते. कंपनीने या निष्कर्षाला आव्हान दिल्यानंतर नमुना संदर्भ प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला. तेथे पॉलिन्यूक्लिअर अॅरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आढळल्याने तो नमुनाही असुरक्षित घोषित करण्यात आला. या प्रकरणातही नियामकाने कंपनीविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. (Bisleri Water Contamination)

मात्र, कंपनीने यापूर्वी गोव्यातील नमुन्याबाबत FSSAI च्या निष्कर्षांवर प्रश्न उपस्थित केले होते. स्वतंत्र प्रयोगशाळेतील तपासणीत ब्रोमेटचे प्रमाण निर्धारित मर्यादेत असल्याचा दावा कंपनीने केला होता. बिस्लेरीने आपल्या उत्पादन प्रक्रियेत १० टप्प्यांमध्ये ९० पेक्षा अधिक गुणवत्ता चाचण्या केल्या जात असल्याचे सांगितले होते. तसेच पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता ही कंपनीची प्राथमिकता असून, नियामकाच्या तपासात सहकार्य करणार असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र, पश्चिम बंगालमधील नव्या प्रकरणाबाबत कंपनीची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

हेही वाचा: Veer Savarkar : 150 वर्षांच्या इतिहासात प्रथमच कोलकता महापालिकेत वीर सावरकरांच्या प्रतिमेला स्थान; पण काँग्रेसला झाली पोटदुखी

बिस्लेरीशी संबंधित या घटनांच्या पार्श्वभूमीवर FSSAI ने देशभरातील बाटलीबंद पाणी आणि मिनरल वॉटर उत्पादक कंपन्यांवरील देखरेख वाढवली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उत्पादन प्रकल्पांची नियमित तपासणी करण्याचे तसेच जोखमीच्या आधारावर पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यासही सांगण्यात आले आहे. (Bisleri Water Contamination)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.