Balbharti Syllabus: इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके पुढच्या वर्षी बदलणार, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक

185
Balbharti Syllabus: इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके पुढच्या वर्षी बदलणार, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठ्यपुस्तकांमध्ये २०२४-२५ या नव्या शैक्षणिक वर्षात कोणताही बदल केला जाणार नाही, मात्र शैक्षणिक वर्ष २०२४-२५ हे इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे शेवटचे वर्ष राहणार आहे. त्यामुळे इयत्ता पहिली आणि दुसरीच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करण्यात यावी, अशी सूचना बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे. (Balbharti Syllabus)

सरावासाठी आवश्यकतेनुसार वह्यांची पृष्ठे समाविष्ट
शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ (जून २०२४) पासून राज्यातील सर्व शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित व अंशतः अनुदानित तसेच खाजगी व विना अनुदानित शाळांमधील इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांसाठी गुजराती, कन्नड, तेलुगु, सिंधी, तमिळ व बंगाली या माध्यमांसाठी तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांची एकूण ४ भागांमध्ये विभागणी करून एकात्मिक स्वरुपातील पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील. या पाठ्यपुस्तकांमध्ये सरावासाठी आवश्यकतेनुसार वह्यांची पृष्ठे समाविष्ट करण्यात आलेली आहेत. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी एकूण दहा माध्यम व सेमी इंग्रजी विषयांची पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येतील.

(हेही वाचा – D. Gukesh : कँडिडेट्स चषकातील विजयानंतर गुकेशने असा साजरा केला आनंद )

नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य…
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी बालवाटिका, बालवाडी, अंगणवाडी तसेच पहिली आणि इयत्ता दुसरीसाठी प्रस्तावित नवीन राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ पासून इयत्ता १ली ते इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या तसेच सेमी इंग्रजीसाठी प्रचलित पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट असलेली एकात्मिक स्वरुपातील पाठ्यपुस्तके एकूण ४ भागांत उपलब्ध करून दिली आहेत.

एक वर्ष आधी विक्रेत्यांना कळवावे लागते
नवीन शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्याने अंमलबजावणी करण्यात येणार असली, तरी राज्य शासनाकडून अद्याप पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्याबाबत कोणतेही आदेश बालभारतीला प्राप्त झालेले नाहीत. पाठ्यपुस्तकांमध्ये अचानक बदल करता येत नाही. त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो. पाठ्यपुस्तके बदलायची असल्यास एक वर्ष आधी विक्रेत्यांना कळवावे लागते, अशी माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी दिली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.