सहा दिवसांत समृद्धी महामार्गावरून धावली ५० हजारांहून अधिक वाहने

97
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणानंतर वाहनधारकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा दिवसांत नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या पहिल्या टप्प्यात ५० हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र समृद्धी महामार्गामधील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ११ डिसेंबरला झाले. या सोहळ्यानंतर दुपारी २ वाजता द्रुतगती मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. तेव्हापासून १६ डिसेंबरपर्यंत ५२० कि.मी.च्या टप्प्यात ५० हजारांहून अधिक वाहनांनी प्रवास केला, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे देण्यात आली.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी

  •  समृद्धी महामार्गाचा वापर करणाऱ्या वाहनधारक व चालकांची  गैरसोय होऊ नये, यासाठी पुरेपुर काळजी घेतलेली आहे.
  • नागपूरहून शिर्डीच्या दिशेने ७, तर शिर्डीहून नागपूरच्या दिशेने ६ असे मिळून एकूण १३ ठिकाणी इंधनाची सोय करण्यात आली आहे.
  • या इंधन स्थानकांवर स्नॅक्स, पिण्याचे पाणी तसेच टायर पंक्चर काढण्यासाठी व टायरमध्ये हवा भरण्यासाठी सोय करण्यात आलेली आहे.
  • वाहनाच्या किरकोळ दुरुस्तीची सुविधा इंधन स्थानकाजवळ पुरवण्यात आली आहे. याशिवाय १६ ठिकाणी महामार्ग सोयी सुविधा (Way side Amenities) सुरु करण्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच प्रवाशांना ती सुविधा उपलब्ध  करुन दिली जाईल.

अपघात घडल्यास….

अपघातग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी इंटरचेंजवर 21 सुसज्ज शीघ्र प्रतिसाद वाहने तैनात आहेत. घटना घडल्यानंतर तातडीने अपघातस्थळी ही वाहने पोहचतील. या वाहनामध्ये रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी व घटना नियंत्रण करणेसाठी फायर फायटिंग सिस्टिम, कटर्स, ऑक्स‍िजन सिलिंडर्स, हायड्रॉलिक जॅक, प्रथमोपचार सुविधा व उपकरणे इ. अत्याधुनिक सुविधा ठेवण्यात आलेल्या आहेत. अपघातग्रस्त वाहन द्रुतगती मार्गावरुन बाजूला घेण्यासाठी 30 मेट्रिक टन क्षमतेची क्रेन 24 तास तैनात आहे. अपघाताची सूचना मिळताच क्रेन तातडीने घटनास्थळी पोहचेल. क्रेनची एकूण संख्या 13 आहे. प्रवाशांच्या मदतीसाठी एकूण 13 गस्त वाहने कार्यरत आहेत. अपघातानंतर वाहतूक नियंत्रित करण्याच्या दृष्टीने द्रुतगती मार्गावर आवश्यक सुरक्षा उपाययोजना गस्त वाहनांमधील कर्मचारी करतील.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.