
-
प्रतिनिधी
Assembly Session चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या स्वप्नांना आता पंख मिळणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ‘आमडी बॅरेज’ प्रकल्पाच्या फाईलला आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अखेर गती मिळाली आहे. मंत्रालयात झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी या प्रकल्पासाठी येत्या ऑगस्ट महिन्यात निविदा काढण्याचे स्पष्ट आश्वासन दिले आहे. यामुळे वर्धा नदीकाठच्या हजारो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. (Assembly Session)
२६४२ हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली
वर्धा नदीवर आमडी गावालगत साकारणाऱ्या या मध्यम प्रकल्पामुळे बामणी, दुधोली, दहेली, जोगपूर, कोर्टीमक्ता, आष्टी, कळमना, आमडी, पळसगाव आणि कोर्टी तुकूम या १० गावांतील सुमारे २६४२ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पामुळे केवळ शेतीलाच पाणी मिळणार नाही, तर पिण्याचे पाणी आणि औद्योगिक वापरासाठीही मोठा साठा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, पळसगाव-आमडी उपसा सिंचन योजनेचे काम पूर्ण झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना आता दुहेरी लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Assembly Session)
(हेही वाचा – धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा आणि आरक्षणाचे लाभ होणार रद्द; Supreme Court चा ऐतिहासिक निकाल )
प्रकल्पाचे स्वरूप आणि तांत्रिक बाजू
हा प्रकल्प वर्धा नदीवरील बंधाऱ्यांच्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सुमारे ४८० मीटर लांबीच्या या बॅरेजमध्ये १५ बाय ७.५ मीटर आकाराचे २६ महाकाय दरवाजे असतील. प्रकल्पाची साठवण क्षमता ५२.२०५ दलघमी इतकी प्रस्तावित असून, त्याचे तांत्रिक आराखडे आता अंतिम टप्प्यात आहेत. एप्रिल २०२६ अखेरपर्यंत याचा सुधारित प्रकल्प अहवाल राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे सादर केला जाणार आहे. (Assembly Session)
मुनगंटीवारांचा ‘फिल्ड’वरचा पाठपुरावा
या बैठकीत आमदार मुनगंटीवार यांनी सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून हा प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळेच जलसंपदा विभागाने ऑगस्टची डेडलाईन निश्चित केली आहे. या प्रकल्पामुळे बल्लारपूरच्या शेतीला नवसंजीवनी मिळणार असून, सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Assembly Session)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
