मुंबई महापालिकेत ६६४ अभियंत्यांची पदे भरणार; लवकरच प्रकाशित होणार जाहिरात

631
मुंबई महापालिकेत ६६४ अभियंत्यांची पदे भरणार; लवकरच प्रकाशित होणार जाहिरात
मुंबई महापालिकेत ६६४ अभियंत्यांची पदे भरणार; लवकरच प्रकाशित होणार जाहिरात

मुंबई महापालिकेतील अभियंता संवर्गातील अनेक पदे रिक्त असून या रिक्त पदांवर लवकरच भरती केली जाणार आहे. तब्बल ६६४ अभियंत्यांची पदे भरली जाणार असून त्यामध्ये कनिष्ठ अभियंता पदी ३६९ आणि दुय्यम अभियंतापदी ३१५ पदांचा सामावेश आहे. ही पदे भरण्यास महापालिका प्रशासनाची मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे लवकरच याबाबतच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करून उमेदवारांकडून अर्ज भरुन घेतले जातील, अशी माहिती मिळत आहे.

मुंबई महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : २३४, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) : ११५, दुय्यम अभियंता (स्थापत्य) : २२६, दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) : ८० आणि दुय्यम अभियंता (वास्तूशास्त्रज्ञ) : ०९ पदे रिक्त असून ही पदे भरण्यास महापालिका प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर ही पदे सरळ सेवा भरतीने भरण्यासाठी महापालिकेच्यावतीने इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन अर्थात आयबीपीएस या संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेच्या नेमणुकीला महापालिका प्रशासकांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांची मान्यता मिळाल्यामुळे लवकरच याबाबतच्या भरतीची जाहिरात प्रकाशित केली जाण्याची शक्यता आहे.

अभियंत्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सात महिन्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात झालेल्या अभियंता संघटनेच्या बैठकीनंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासकांना ही पदे तात्काळ भरण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्यानंतर आजवर मंजुरीच्या प्रतीक्षेत असणारी ही भरती प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झाला असून सरळ सेवा भरती करण्यासाठी महापालिकेने आयबीपीएस या संस्थेच्या नेमणुकीला प्रशासकांनी मान्यता दिल्याने याबाबतची जाहिरात लवकरच प्रकाशित होईल असा विश्वास महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या जाहिरातीद्वारे उमेदवारांकडून अर्ज मागवून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेत तांत्रिक ज्ञान ६०, बौध्दिक ज्ञान २० व सामान्य ज्ञान २० अशाप्रकारे एकूण १०० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त पदांच्या अनुषंगाने जात प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार निवड यादी तयार करण्यात येईल. या पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक व त्या अनुषंगाने असलेली प्रमाणपत्रे व कागदपत्रांची योग्य पडताळणी करून उमेदवारांची नियुक्ती करून सरळसेवेने त्या त्या प्रवर्गानुसार पदे भरली जातील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – शहर भागातील नाले आणि मिठी नदीची सफाई अपूर्ण, तरीही महापालिका प्रशासन म्हणतेय १०० टक्के सफाई झाली म्हणून…)

काही दिवसांपूर्वी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष यांनी महापालिका आयुक्तांना स्मरणपत्र पाठवून अभियंत्यांची रिक्तपदे त्वरीत भरली जावी अशाप्रकारची मागणी करत मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीतील आश्वासनांची आठवण करून दिली होती. त्यामुळे ही परिक्षा प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएसची नेमणूक झाल्याने लवकरच जाहिरात प्रकाशित होईल असे बोलले जात आहे.

अशाप्रकारे भरली जाणार पदे

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) : एकूण पदे २३४
  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत) : एकूण पदे ११५
  • दुय्यम अभियंता (स्थापत्य) : एकूण पदे २२६
  • दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) : एकूण पदे ८०
  • दुय्यम अभियंता (वास्तूशास्त्रज्ञ) : एकूण पदे ०९

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.