मलनि:सारण प्रचालन विभागात २२४ पदे रिक्त; अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या वाहनांची देखभाल करते खासगी कंपनी

95

मलनि:सारण प्रचालन विभागात कामगार संवर्गातील ३९३ पदे मंजूर असून त्यातील तब्बल २२४ पदेही रिक्त आहेत. त्यामुळे या विभागात केवळ ३९३ पदांपैकी १६९ कामगार कार्यरत असून वाहन चालक नि यांत्रिकी श्रेणीतील ५ पदांपैकी सर्वच पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे न भरता खासगी कंपन्यांच्या माध्यमातून वाहनांसह मनुष्यबळाची सेवा घेतली जात आहे. त्यामुळेच अमिताभ बच्चन यांनी देणगीद्वारे दिलेल्या मलवाहिनी स्वच्छ करणारे जेटींग ग्रॅब व रॉडींग यंत्राची देखभाल अपुऱ्या मनुष्यबळाचा दाखला देत खासगी संस्थेवर देखभालीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या कंपनीला पाच वर्षांसाठी ७७ लाख रुपये मोजले जाणार आहेत.

मलनि:सारण प्रचालन खात्यांतर्गत मुख्य मलनि:सारण विभागांमार्फत पश्चिम, पूर्व उपनगरे तसेच शहर भागातील नलिका आणि मुख्य मलवाहिन्यांच्या जाळ्यांच्या देखभालीचे कार्य विविध क्षमतेच्या वाहनावर बसवलेल्या यंत्राद्वारे केले जाते. भारत सरकारने हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवा योजनेस प्रतिबंध आणि त्यांचे पुनर्वसन अधिनियम २०१३ हा कायदा कर्मचाऱ्यांना गटारांच्या धोकादायक साफसफाईसाठी प्रतिबंधित करतो. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना मलवाहिन्यांच्या सफाईकरता अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत कार्यप्रणाली वापरण्यास सुचित केले आहे.

(हेही वाचा सर्वोच्च न्यायालयाच्या ‘त्या’ टिपण्णीवर मनसेची भूमिका; हिंदूंना एक आणि मुसलमानांना एक न्याय)

या व्यापक सार्वजनिक हिताच्या दृष्टीकोनातून चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी महापालिकेतील के पश्चिम विभागाला तत्कालिन सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे विशेष उद्देशिय वाहनांवर बसवलेले जेटींग, ग्रॅब व रॉडींग यंत्र हे एक यंत्र देणगीद्वारे यांच्याकडे देणगी म्हणून सुपूर्त केले आहे. परंतु या वाहनाचा वापर करण्याबाबत के पश्चिम देखभाल विभागाचे सहायक अभियंता यांनी प्रमुख अभियंता (मलनि:सारण प्रचालन) विभागाला विनंती केली होती. त्यानुसार या वाहनाची पुढील देखभाल करणे संबंधित विभागाला मनुष्यबळाचा अभावी शक्य नसल्याने त्यांनी या वाहनाच्या देखभालीसाठी खासगी कंपनीची निवड केली असून पुढील पाच वर्षांच्या देखभालीसाठी ७७ लाख रुपये खर्च केले जाणार आहे.

अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या वाहनाचे प्रचालन आणि देखभालीचे काम हे उपलब्ध कामगार व कर्मचाऱ्यांमार्फत करता येणे शक्य नसल्याने हे काम कंत्राटदारामार्फत करणे गरजेचे असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीकोपातून मलनि:सारण वाहिन्यांमध्ये येणाऱ्या तुंब्याच्या तक्रारींचे निवारण तातडीने करणे शक्य होईल. त्यामुळे वाहन वापरण्याच्या कालावधीपर्यंत अथवा पुरेसे कुशल तथा अकुशल कामगार उपलब्ध होईपर्यंत खासगी कंपनीची निवड करून त्यांच्या मार्फत याची देखभाल केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.