Seven Hills : सेव्हन हिल्स रुग्णालयात डायलिसिस सुविधेसह १०० खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू

147

मुंबईतील महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर स्थितीतील रुग्णांकरीता सेव्हन हिल्स रुग्णालयात डायलिसिस सुविधेसह १०० रुग्ण शय्या क्षमतेचा अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी ताप-अंगदुखीच्या तक्रारींचे रुग्ण गंभीर अवस्थेत उपनगरीय रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये कमतरता राहू नये यासाठी महानगरपालिकेने अतिदक्षता विभागात खाटा अतिरिक्त संख्येने उपलब्धता करण्यासाठी मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयाची निवड केली आहे.

महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी याबाबत आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार ही कार्यवाही महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे .

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील निदान व वैद्यकीय उपचार सुविधांचा लाभ मुंबई महानगरातील नागरिकांसह लगतच्या मीरा-भायंदर, वसई-विरार ते थेट पालघर-डहाणू, ठाणे-कल्याण, अंबरनाथ-बदलापूर या परिसरातील नागरिकांना देखील होतो. दरवर्षी पावसाळ्यामध्ये महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढत असते. उपनगरीय रुग्णालयांचे प्रशासन पावसाळाजन्य आजारांच्या रुग्णांना दाखल करुन, त्यांचेवर आवश्यक ते उपचार करण्यासाठी सज्ज असतात. रुग्णांवर उपचार करीत असताना आजारांच्या स्थितीची सर्व माहिती संकलन करून, त्याचे विश्लेषण करून आरोग्य कार्यवाहीची दिशा देखील ठरवली जाते.

(हेही वाचा MNS : सीमा हैदरवर चित्रपट काढणा-या निर्मात्याला मनसेचा इशारा)

कोविड संसर्ग कालावधीत सेव्हन हिल्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रुग्ण शय्या कार्यान्वित होत्या. या पायाभूत सुविधांचा वापर नागरिकांच्या हितासाठी व्हावा, याकरीता महानगरपालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांत दाखल झालेल्या गंभीर अवस्थेतील रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रुग्णांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात अतिदक्षता विभागात १०० खाटा राखून ठेवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे ह्यांनी सेव्हन हिल्स रुग्णालय प्रशासनाला दिले.

मुंबईतील महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातून पाठविलेल्या रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयात डायलिसिससह अतिदक्षता विभागाची आणि संभाव्य इतर आजारांवरील उपचारांची सेवा महानगरपालिकेच्या दरांनुसार उपलब्ध करण्यात यावी, त्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी यांनी त्याची देखरेख करावी, असे निर्देश देखील डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.