Nanded : राज्याच्या अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर, तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी राज्यभरात नियमभंग करणाऱ्यांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. अशातच, नांदेड जिल्ह्यातून एक धडक कारवाईची घटना समोर आली आहे. 90 वर्षीय वृद्ध रुग्णासाठी खरेदी करण्यात आलेल्या मधुमेहाच्या गोळ्या मुदतबाह्य (expired) निघाल्या. याबाबत रुग्णाच्या मुलाने थेट तुकाराम मुंढेकडे ईमेलद्वारे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर FDA चे पथक तात्काळ कारवाईसाठी रवाना झाले.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात राहणारे हनुमंत वनाळेकर, हे आपल्या 90 वर्षीय वडिलांसाठी मधुमेहावरील औषधे खरेदी करण्यासाठी शनिवारी नांदेड शहरातील ‘डॉक्टर लेन’ परिसरातील ‘तोष्णीवाल मेडिकल’मध्ये गेले होते. त्यांनी तेथून मधुमेहाच्या औषधांची तीन पाकिटे विकत घेतली.
घरी परतल्यानंतर औषधांची तपासणी करताना त्यांच्या मुलीच्या निदर्शनास आले की, खरेदी केलेल्या गोळ्यांची मुदत डिसेंबर 2025 मध्येच संपली होती. म्हणजेच ग्राहकाला एक्सपायरी डेट उलटून गेलेली औषधे विकण्यात आली होती.
मधुमेहासारख्या गंभीर आजारासाठी नियमित औषधोपचार अत्यंत महत्त्वाचे असतात. अशा परिस्थितीत मुदतबाह्य औषधांचा वापर रुग्णांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. औषधाची परिणामकारकता कमी होणे, दुष्परिणाम होणे किंवा उपचारांवर विपरीत परिणाम होणे यांसारखे धोके निर्माण होऊ शकतात.
एक ई-मेल आणि थेट कारवाई
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन, हनुमंत वनाळेकर यांनी थेट FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांना ई-मेलद्वारे तक्रार केली. तक्रार प्राप्त होताच मुंढे यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.
आयुक्तांकडून निर्देश मिळाल्यानंतर FDA च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित मेडिकल स्टोअरची तपासणी केली. तपासादरम्यान औषध विक्रीशी संबंधित नोंदींची पाहणी करण्यात आली तसेच मुदतबाह्य औषधांच्या विक्रीबाबत माहिती गोळा करण्यात आली.
FDA च्या मेडिकल स्टोअरवरील कारवाईदरम्यान झालेल्या प्राथमिक चौकशीत, मुदतबाह्य औषध विक्रीचा प्रकार समोर आल्यानंतर, संबंधित मेडिकल स्टोअरविरोधात नियमानुसार कारवाई करण्यात आली. FDA अधिकाऱ्यांनी संबंधित औषधांचा साठा तपासला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राज्यभरात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली आहे. बनावट औषधे, मुदतबाह्य उत्पादने, नियमबाह्य अन्नपदार्थ आणि परवान्याच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर सातत्याने कारवाई केली जात आहे.
Join Our WhatsApp Community

