आता रिक्षा चालकांसाठी महामंडळ, ‘एसटी’लाही गतवैभव मिळवून देणार- अनिल परब

87

रिक्षा चालकांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा विचार आहे. कोरोनामुळे रिक्षा चालकांची आकडेवारी सरकारकडे आली असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली यासह एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून एसटीचे गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्व प्रकारचे प्रयत्न करेल. त्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.

कोरोनानंतर एसटी पूर्वपदावर

अमृतमहोत्सवी वर्षातील पदार्पण हा एसटीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा आहे. एसटीच्या स्थित्यंतराचे आपण साक्षीदार आहोत. रस्त्यात अडचणी येतात, खड्डे असतात मात्र मार्ग काढत एसटीचा प्रवास सुरू आहे. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. ही प्रत्येक गावातील माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. एसटीचे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात आहे. कोरोनाच्या काळात एसटीने आगळेवेगळे काम केले आहे. टाळेबंदीमध्ये साडेसात लाख कामगारांना पराराज्याच्या सीमेवर जाण्यासाठी मोलाचे काम एसटी कर्मचाऱ्यांनी केले. कोरोनानंतर एसटी पूर्वपदावर येत आहे, असेही परबांनी म्हटले आहे.

एसटी बदलांना सामोरी जातेय

पुढे परब असेही म्हणाले की, एसटीचा तोटा कमी करून फायदा कसा होईल याकडे लक्ष दिले जात आहे. त्यासाठी मालवाहतूकीकडेही अधिक लक्ष देण्यात येत आहे. एसटी बदलांना सामोरे जात असून आज पहिली एसटी इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ बस सुरू केली आहे. कोरोना संकटाचा काळ विसरून एसटीच्या वैभवासाठी नव्या दमाने सुरूवात करण्याचे आवाहन ॲड.परब यांनी केले. प्रवाश्यांची सेवा, कर्मचाऱ्यांची काळजी आणि आणि आपल्या व्यवसायिक कर्तव्यावर प्रेम अशा त्रिसूत्री नुसार काम करूया.

(हेही वाचा – प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी वापरल्यास होणार कायदेशीर कारवाई)

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आळंदी रोड कार्यालयाच्या चाचणी मैदानावर उभारलेल्या २५० मीटर ब्रेक टेस्ट ट्रॅक आणि माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून उभारलेल्या हलक्या वाहनांसाठी रोलर ब्रेक टेस्टरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार गिरीश बापट, आमदार सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे आरटीओचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे आदी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.