ठाकरे सरकारमधील तिसरी ‘विकेट’ पडणार?

दोन मंत्र्यांच्या विकेट पडल्यानंतर तिसरा नंबर कुणाचा लागणार अशी चर्चा रंगली असताना, आता अनिल परब यांची देखील विकेट पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

118

पूजा चव्हाण प्रकरणावरुन शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला, तर परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बमुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. ठाकरे सरकारमधील या दोन मंत्र्यांच्या विकेट पडल्यानंतर तिसरा नंबर कुणाचा लागणार अशी चर्चा रंगली असताना, आता अनिल परब यांची देखील विकेट पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री ठेवणार परबांना मंत्रीपदापासून लांब?

अनिल परब यांच्यावर सातत्याने होत असलेले आरोप यामुळे त्यांना काही काळ मंत्रीपदापासून दूर ठेवावे, असा एक मतप्रवाह ठाकरे सरकार आणि विशेषत: शिवसेनेच्या एका गटाचा झाला आहे. अनिल परब यांच्यावर नुसतेच आरोप होत नाहीत, तर थेट मातोश्रीवर देखील बोट दाखवले जात असल्यानेच अनिल परब यांना लांब ठेवणेचे मुख्यमंत्र्याच्या हिताचे असल्याचे काही मंत्री खासगीत बोलत आहेत. त्यामुळे एकूणच परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिवहन मंत्री अनिल परब यांना काही काळ लांब ठेवणार का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

(हेही वाचाः अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? आता दिल्लीचे पथक येणार मुंबईत)

म्हणून मेट्रोच्या कार्यक्रमापासूनही लांब ठेवेले

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ च्या चाचणीला सोमवारपासून सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या या कार्यक्रमाला परिवहन मंत्री अनिल परब गैरहजर राहिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही, अनिल परब गैरहजर राहिले याचे आश्चर्य व्यक्त केले जात होते. याबद्दल काहींना विचारले असता अनिल परब यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच या कार्यक्रमास येणे टाळा, असे सांगितल्याचे कळते. अनिल परब यांच्यावर ३०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप होत असताना, थेट मातोश्रीवर बोट उचलले जात आहे. त्यामुळे जर परब या कार्यक्रमास आले, तर त्यांना माध्यमांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले असते, याचमुळे अनिल परब यांनी या कार्यक्रमास जाण्यास टाळल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.

(हेही वाचाः राणेंची हरकुळच्या परबांवर मालवणीत टीका, काय म्हटल्यानी? तुम्हीच वाचा…)

परबांविरोधात महाविकास आघाडीतील एक गटही सक्रीय

एकीकडे अनिल परब विरोधकांच्या रडारवर असताना अनिल परब यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा एक गट देखील सक्रीय झाला आहे. हा गट आधीपासूनच अनिल परब यांच्या विरोधात आहे. याआधीही अनिल देशमुख गृहमंत्री असताना अनिल परब हे गृह खात्यात ढवळाढवळ करत असल्याने राष्ट्रवादी नाराज होती. तशी तक्रारच शरद पवार यांच्याकडे करण्यात आली होती. त्यातच आता अनिल परब यांच्या विरोधात होणाऱ्या आरोपांचा फायदा घेत, त्यांना तूर्तास तरी मुख्यमंत्र्यांनी बाजूला ठेऊन, स्वत:ची प्रतिमा जपावी असा सूर विरोधी गटाचा आहे. एवढेच नाही तर शिवसेनेमध्ये देखील अनिल परब यांच्या विरोधात एक गट तयार झाला असून, हा गट मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची बातमी देखील सर्वात आधी हिंदुस्थान पोस्टने दिली होती. त्यामुळे भविष्यात परबांविरोधातील शिवसेनेतील हा गट देखील सक्रीय होऊ शकतो.

(हेही वाचाः अनिल परब यांच्या अडचणी वाढणार? आता दिल्लीचे पथक येणार मुंबईत)

आतापर्यंत परबांवर झाले हे आरोप

अनिल परब यांच्यावरील आरोपांचा सिलसीला कायम असून, सगळ्यात आधी त्यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप झाला होता. एनआयएच्या कोठडीत असलेल्या वाझेने एनआयएला एक पत्र लिहिले होते. ज्यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केला होता. मात्र त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनिल परब यांच्या मागे उभे राहिले होते. त्यानंतर सातत्याने भाजपचे खासदार किरीट सोमय्या हे अनिल परब यांच्यावर आरोप करत होते. अनिल परब यांनी लॉकडाऊन काळात शेतजमिनीवर रिसॉर्टचं बांधकाम करुन, फसवणूक केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. अनिल परब यांच्यावर ताबडतोब फसवणूक करण्यासाठी मंत्रीपदाचा दुरुपयोग आणि लॉकडाऊनच्या नियमांना डावलून २०२० मध्ये तीन मजली रिसॉर्ट बांधल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली होती.

(हेही वाचाः आता अनिल परबांचा ३०० कोटी बदली घोटाळा?

आता तर त्यांच्यावर त्यांच्याच विभागातील निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तक्रार दाखल केली. आरटीओ खात्यात पदोन्नतीसाठी आणि इतर व्यवहारात भ्रष्टाचार होतो, असा आरोप त्यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने ३०० कोटी रुपयांचा ट्रान्सफर पोस्टिंग घोटाळा केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. गजेंद्र पाटील यांनी या महावसुली विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पाटील हे नाशिक परिवहन विभागात मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत होते.

(हेही वाचाः परबांवरील आरोपांनी वाढली मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.