लोकसभा निवडणुकीत BJP गुजरातमध्ये शतप्रतिशतची हॅट्रिक करणार?

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष विजयासाठी निवडणूक लढत नाही तर सर्वात मोठा विजय मिळविण्यासाठी मैदानात उतरला आहे.

110
  • वंदना बर्वे

गुजरातमधील लोकसभेची निवडणूक ही अन्य राज्यांतील निवडणुकीपेक्षा फार आगळीवेगळी आहे. कारण, गुजरातची सीमा नरेंद्र मोदी याना नावापासून सुरू होते आणि याच नावावर येवून संपते. निवडणुकीच्या बाबतीतही असेच आहे. नरेंद्र मोदीपासून सुरू होते आणि नरेंद्र मोदी याच नावावर येवून संपते. गुजरातमधील 25 जागांसाठी पाचव्या टप्प्यात 7 मे रोजी निवडणूक होत आहे. तसं बघितलं तर, गुजरातमध्ये लोकसभेच्या 26 जागा आहेत. परंतु, सूरतच्या जागेवर भाजपाचा (BJP) उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. यामुळे निवडणूक फक्त 25 जागांसाठी होणार आहे.

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्ष विजयासाठी निवडणूक लढत नाही तर सर्वात मोठा विजय मिळविण्यासाठी मैदानात उतरला आहे. गुजरातमधील सर्व 26 जागांवर 7 मे रोजी निवडणूक होणार आहे. 400 चा आकडा पार करण्याचा बिगुल फुंकणाऱ्या भाजपासाठी गुजरातच्या 40 अंश तापमानात 25 जागांवर लोकांना बूथवर आणण्याचे मोठे आव्हान असेल. जास्त मतदान म्हणजे मोठा विजय. गुजरातमध्ये 2019 च्या निवडणुकीत 64.5 टक्के, 2014 मध्ये 63.6 टक्के, 2009 मध्ये 47.9 टक्के मतदान झाले होते. जास्त मतदान झाल्यावर निकाल भाजपाच्या (BJP) बाजूने लागला.

(हेही  वाचा Love Jihad : अश्लिल व्हिडीओ बनवत नराधम हाशिम धर्मांतरासाठी टाकत होता दबाव )

गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपाने गुजरातमध्ये सर्व 26 जागा जिंकत क्लीन स्वीप केला आहे. यावेळीही भाजपा सर्व जागांवर मजबूत आहे. या निवडणुकीत भाजपाने अशा 18 जागा निवडल्या आहेत ज्या दोन लाखांपेक्षा जास्तच्या फरकाने जिंकायच्या आहेत. उर्वरित 11 जागांवर गेल्या वेळी 75 हजार ते दीड लाखांचा फरक होता. यात मोठी भर घालण्याची तयारी सुरू आहे.

शहा 10 तर पाटील आठ लाखाने जिंकणार

भाजपाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे दुसरे उदाहरण कदाचित कुठे बघायला मिळेल. भाजपाने गृहमंत्री अमित शहा यांच्या गांधीनगर मतदारसंघातून 10 लाखांच्या आणि सी.आर. पाटील यांच्या नवसारी मतदारसंघातून आठ लाखाच्या फरकाने जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. मागच्या निवडणुकीत पाटील हे सहा लाख 89 हजार मतांनी विजयी झाले होते. हा विजय देशातील सर्वात मोठा विजय होता.

निवडणुकीपेक्षा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठाचे पोस्टर्स जास्त

भाजपासाठी गुजरात म्हणजे हिंदुत्वाची सर्वात मोठी प्रयोगशाळा होय. येथील 88 टक्के लोकसंख्या हिंदू आहे. गांधीनगर ते अहमदाबाद. राजकोट ते जामनगर. आणि वडोदरा ते भडूचपर्यंतच्या रस्त्या—रस्त्यावर लागलेले निवडणुकीचे पोस्टर्स बघितले की भाजपाची हवा असल्याचे दिसते. गुजरातमध्ये लागलेल्या एकूण पोस्टर्समध्ये जवळपास 90 टक्के पोस्टर्स हे केवळ अयोध्येतील राममंदिरात झालेल्या रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठाचे आहेत. राजकारणाचे गणित समजून घेतले तर लक्षात येईल की, भाजपाला हिंदुत्वाशी संबंधित प्रत्येक मुद्द्याचा सर्वाधिक फायदा हा गुजरातमध्ये झाला आहे. किंबहुना, या निवडणुकीत राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा जेवढा फायदा यूपीला मिळेल त्यापेक्षा जास्त आणि मोठा फायदा गुजरातमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

भाजपाने पहिल्यांदाच घोषित उमेदवार बदलले

गुजरातच्या इतिहासात भाजपाला पहिल्यांदाच घोषित उमेदवार बदलावे लागले आहेत. यावेळी भाजपाने दोन उमेदवार बदलले. यात बडोदा आणि सांबरकांठा या दोन मतदासंघातील उमेदवारांचा समावेश आहे. रंजनबेन भट्ट यांना बडोद्यातून तिकीट मिळाले होते. भट्ट हे दोन वेळा खासदार राहिले आहेत. मात्र विरोध इतका तीव्र होता की, त्यांच्याकडून तिकीट काढून घेण्यात आले. किंबहुना, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांचाही भट्ट यांना नकार होता, असे म्हणतात. सांबरकांठामधून भिखाजी ठाकोर यांना तिकीट दिले होते. पण, त्यांच्या नावालाही विरोध झाला. यामुळे तिकीट बदलावे लागले. काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या राजकीय संस्कृतीचा हा भाग मानला जातो. चार महिन्यांत काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिले आहेत. शिवाय, अमरेली आणि सुरेंद्र नगरमधून मोठ्या नेत्याच्या जागी तरुण नेत्याला तिकीट दिल्यामुळे भाजपातील नेत्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

(हेही वाचा Narendra Modi: कॉंग्रेस संधी मिळताच तुमची संपत्ती हिरावून घेईल, मोदींनी माळशिरसमधील सभेत डागले टीकास्र)

पाच जागा भाजपाठी आव्हान ठरल्या

भरुच : ही जागा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांची परंपरागत जागा आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष गुजरातमध्ये आघाडी करून लढत आहे. भरूचची जागा आप लढवित आहे. येथे काँग्रेसने अहमद पटेल यांच्या कुटुंबातील कुणाला तरी एखाद्या व्यक्तीला तिकीट द्यायला हवे होते, असे मत आहे. चेतन वसावा यांना आप पक्षाने तिकीट दिले असून त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाचे 6 वेळा खासदार मनसुख वसावा आहेत. चेतन वसावा यांची आदिवासींमध्ये चांगली पकड आहे. काँग्रेससोबत युती नसतानाही आम आदमी पक्षाने त्यांच्या नावाची घोषणा केली होती.

राजकोट : केंद्रीय मंत्री पुरूषोत्तम रुपाला यांनी क्षत्रियांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या वादाचा परिणाम केवळ गुजरातमध्येच नाही तर इतर राज्यांमध्येही दिसून येत आहे. राजकोट आणि सौराष्ट्र या भागात मोठमोठी निदर्शने आणि बैठका झाल्या आहेत. पण क्षत्रियांच्या मतांवर किती प्रभाव पडेल याचे गणित अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, रुपाला यांनी या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. माझ्याकडून चूक झाली आहे, असेही सांगितले.

भावनगर : सौराष्ट्र हा भाजपाचा (BJP) बालेकिल्ला असला तरी या जागेवर भाजपाच्या अडचणी वाढवण्याची दोन मोठी कारणे आहेत. आम आदमी पक्षाने काँग्रेससोबत करार करून येथून आपला उमेदवार उभा केला आहे. दुसरे म्हणजे, रुपालाबाबत क्षत्रियांतील वादाचा थेट परिणाम भावनगरवर होऊ शकतो.

बनासकांठा : येथे दोन महिलांमध्ये लढत आहे. काँग्रेसच्या जेनी बेन निवडणूक लढवत आहेत. रेखा चौधरी भाजपाच्या उमेदवार आहेत. जेनी बेन यांची प्रतिमा एका शक्तिशाली नेत्याची आहे आणि त्यांचा स्थानिकांशी संपर्क खूप मजबूत आहेत. तर रेखा चौधरी या बनास डेअरी सुरू करणाऱ्या कुटुंबातून येतात. जेनी बेनच्या स्टाइलची खूप चर्चा आहे. त्या ट्रॅक्टरवर बसून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेल्या होत्या. त्या अनेकदा घुंघट काढून स्टेजवरून भाषण करताना दिसतात. कधी—कधी तर त्या स्टेजवरूच ढसाढसा रडायला लागतात. यामुळे त्यांची चर्चा होत आहे. त्या दोन वेळा आमदारही राहिले आहेत.

जुनागड : जुनागडमध्ये उमेदवाराला विरोध जोरदार आहे. येथून भाजपाने राजेश चुडासामा यांना तिकीट दिले आहे. डॉक्टरच्या हत्येशी संबंधित प्रकरण त्याच्यावर खूप चर्चेत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.