Congress : जागावाटपात काँग्रेसला का आले अपयश? अशोक चव्हाणांनी सांगितली कारणे

125
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी घेतली खासदारकीची शपथ

महाराष्ट्र काँग्रेसकडे (Congress) मुत्सद्देगिरीचा आभाव असून त्यांच्या नेत्यांकडे व्यवहारचातुर्य नाही. आघाडीच्या जागावाटपात जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्याइतपत त्यांचा अभ्यास नाही. नुसत्या बैठकीत बसून गप्पा मारायच्या आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन जेवणं करायची, याचा हा सगळा परिणाम आहे. खरे तर महाराष्ट्र काँग्रेसमधील नेत्यांना कुठल्याही जागावाटपामध्ये स्वारस्य राहिलेले नाही. त्यामुळेच त्यांच्या पदरात अपयश पडले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी केली.

काँग्रेसकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे दुर्लक्ष 

महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून काँग्रेसमध्ये (Congress) असंतोष आहे. मुंबईतील दक्षिण मध्य मुंबईसह भिवंडी, सांगलीची जागा सोडण्याच्या काँग्रेसच्या मागणीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी दुर्लक्ष केले. लोकसभेच्या काही जागांवर अंतिम निर्णय झालेला नसताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी परस्पर जागा घोषित केल्या. आघाडीत काँग्रेसच्या वतीने जागावाटप करण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली होती. मात्र, चव्हाण यांनी पक्षाला ठेंगा दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी महत्वाच्या जागांचा आग्रह धरला नसल्याचे सांगत काँग्रेसचे नेते जागावाटपातील अपयशाचे खापर अशोक चव्हाण यांच्यावर फोडत आहे.

(हेही वाचा Lok Sabha Election 2024 : मुंबई उत्तर-पश्चिममधून संजय निरुपम यांना उमेदवारी? )

या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली. मी काँग्रेसमध्ये असताना निश्चितच काँग्रेसला (Congress) चांगल्या जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केला. आघाडीत चर्चेच्यावेळी कोकणातील एकमेव भिवंडीची जागा इतर कोणत्याही पक्षाला न सोडण्याबाबत ठाम भूमिका घेतली होती. हिंगोलीची जागादेखील सोडली नसती. सांगलीची जागा सोडण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. मी या जागांसाठी प्रयत्न करत होतो. तसेच काँग्रेसला मुंबईत तीन जागा मिळाव्यात यासाठी मी आग्रही होतो, असा खुलासा चव्हाण यांनी केला.

काँग्रेसची धुळधाण केली

आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने काँग्रेसची धुळधाण केली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मला काँग्रेस पक्ष (Congress) सोडून दीड महिना झाला आहे. तरीदेखील हे लोक माझ्यावर टीका करतात हे हास्यास्पद आहे. काँग्रेसच्या नेत्यांमध्ये निर्णयक्षमता नाही. परंतु, कोणाबद्दल तरी बोलायला हवे म्हणून ते माझे नाव घेत आहेत. कारण त्यांना वाटते आता अशोक चव्हाण काँग्रेस पक्षात नाहीत त्यामुळे आपण त्यांना काहीही बोलू शकतो. त्यांना बोलल्यामुळे कोणाला काही फरक पडणार नाही. अशोक चव्हाणांवर टीका करणे सोयीचे आहे. त्यामुळे माझ्यावर खापर फोडण्याचा प्रकार चालू आहे. लोकांच्या रोषाला सामोरे जायची त्यांच्यात हिंमत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षनेतृत्वाला काय उत्तर द्यायचे हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच हे सगळे उद्योग चालले आहेत, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.