एकेकाळी ‘मातोश्री’साठी विश्वासू बनलेले नीरज गुंडे आहेत तरी कोण?

बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये मोठ्या पदांवर कामाचा अनुभव असलेल्या गुंडे यांची सध्या केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही उठबस असते.

82

एनसीपीचे प्रवक्ते नवाब मलिक मागील २ दिवसांपासून चेंबूरमधील ‘ती’ व्यक्ती कोण आहे?, जिचे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या भाजपाच्या नेत्यांशी उठबस सुरु असते, त्याचा खुलासा झाल्यावर भाजपच्या नेत्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असे म्हणत होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी, ‘ती व्यक्ती नीरज गुंडे असून, तो भ्रष्टाचार करणाऱ्यांची माहिती देतो, तो चांगलाच आहे’, असे म्हणाले आणि नीरज गुंडे चर्चेत आले. मलिकांनी सोमवारी ‘नीरज गुंडे यांचे फडणवीस यांच्याशी काय संबंध आहेत?’, असा प्रश्न केला. त्याला प्रत्युत्तर देत फडणवीस यांनी ‘हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारा, तो त्यांच्या संपर्कात असतो’, असे म्हणाले. फडणवीसांच्या प्रत्युत्तरात दडलेली गुपिते आता समोर येऊ लागली आहेत.

नीरज गुंडेंना थेट ‘मातोश्री’त होता प्रवेश 

नीरज गुंडे हे एकेकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासातील होते. इतके की, त्यांना थेट ‘मातोश्री’ बंगल्यावर प्रवेश असायचा, असे बोलले जात आहे. २०१४ सालापासून गुंडे सेनेच्या गळ्यातील ताईत बनले. राजकारणात सेनेला भाजपसोबत मित्रत्वाचे नाते कायम टिकवून ठेवण्यासाठी गुंडे हे सेना-भाजप यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत राहिले. निवडणुकीत जागा वाटपापासून ते सत्तेच्या वाटपामध्ये गुंडे केंद्रस्थानी राहिले, असेही बोलले जात आहे.

(हेही वाचा : मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध! पुरावे शरद पवारांनाही देणार)

अभियंता असलेले गुंडेंची अधिकाऱ्यांमध्ये उठबस!

बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये मोठ्या पदांवर कामाचा अनुभव असलेल्या गुंडे यांची सध्या केवळ राजकीय वर्तुळातच नाही तर आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही उठबस असते. ते यशस्वी व्यावसायिक आणि अनेक कॉर्पोरेट्सचे सल्लागार आहेत. गुंडे हे शिक्षणाने अभियंते असले तरी व्यवसायाने उद्योजक आहेत, चेंबूरचे अभियंता असलेले नीरज गुंडे हे सेना-भाजपमधील दुवा होते. ठाकरे – फडणवीस भेटीचे सूत्रधार ते जागावाटप आणि सत्तास्थापनेपर्यंत गुंडेंचा सहभाग होता, असे सांगितले जाते.

मी पुरावे असल्याशिवाय बोलत नाही!

मी फक्त त्यांच्यामागे लागतो जे भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत आणि ज्यांच्या विरोधात माझ्याकडे भक्कम पुरावे आणि कागदपत्रे आहेत, असे गुंडे सांगतात. गुंडे कुटुंब नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहिले आहे. मी एक स्वतंत्र व्हिसल ब्लोअर आहे. मला जे व्यक्त व्हायचे ते मी समाजमाध्यमातून व्यक्त होतो. माध्यमांशी मी कधीच बोलत नाही. मी बोललो तर त्या गोष्टी ट्विस्ट होतात. मग तुम्हाला कॅटगराईज्ड केले जाते. काही लोक माहितीचा गैरफायदाही घेतात, अशी गुंडे यांची भूमिका आहे. एखाद्याच्या विरोधात भक्कम पुरावे हाती लागल्यावर गुंडे थेट ती ट्विटर टाकून ते ट्विट पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांना टॅग करतात, अशी त्यांची कार्यपद्धत आहे.

काय आहे नीरज गुंडे यांची कारकीर्द?

२०१५ साली ललित मोदींच्या गैरवर्तनादरम्यान आणि जेव्हा बीसीसीआयचे तत्कालीन सचिव अनुराग ठाकूर आणि कथित बुकींसह छायाचित्रे समोर आली होती, तेव्हा गुंडे शेवटचे प्रकाशझोतात आलेले. गुंडे यांना सोपवलेली जबाबदारी ते चोखपणे आणि शांतपणे पूर्ण करतात, अशी त्यांची ख्याती आहे. भाजपमधील वादग्रस्त नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्याशी गुंडे यांचे घनिष्ठ संबध आहेत. युपीए सत्तेत असताना भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यासोबत विमान आणि 4G सह अनेक घोटाळ्यांवर त्यांनी काम केले. नुकतेच पुणे, ठाणे आणि मुंबईतील सुमारे ४० महत्वाच्या बांधकाम तसेच बड्या व्यावसायिकांवर आयकर खात्याने छापे टाकले. यात मिळलेल्या रकमेमध्ये मोठी तफावत समोर आली. या कारवाईमुळे राष्ट्रवादीत भूकंप झाला. सन २००० मध्ये या प्रतिष्ठानांच्या गैरव्यवहाराची माहिती पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आली होती. या संबंधीचे ट्वीट नीरज गुंडे यांनी केले आहे.

छगन भुजबळ यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या गुंडेंच्या हिटलिस्टवर आहे. सध्या महाविकास आघाडीच्या मागे विशेषतः राष्ट्रवादीच्या मागे हात धुवून लागलेले नीरज गुंडे भाजप-सेनेतील दुवा आहेत, हे स्पष्ट आहे. त्यांची सध्याची भूमिका भाजप आणि शिवसेनेसाठी पुरक आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. भविष्यात राजकारण कुठल्या दिशेने जाणार हे माहीत नाही. पण गुंडेंच्या कामाचा सध्याचा रोख हा एनसीपीसाठी धोक्याची घंटा आहे, हे निश्चित!

(हेही वाचा : फडणवीस ड्रग्सच्या खेळाचे मास्टरमाईंड! नवाब मलिकांचा थेट आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.