ठाकरेंच्या अडचणी वाढणार; अलिबागमधील १९ बंगल्यांप्रकरणी अहवाल मागवला

२००५ ते २०२२ पर्यंतचे सर्व दप्तर तपासले जाणार आहे.

97
ठाकरेंच्या अडचणी वाढणार; अलिबागमधील १९ बंगल्यांप्रकरणी अहवाल मागवला

अलिबागमधील कोर्लई ग्रामपंचायतीच्या हद्दीत उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांचे १९ बंगले असल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या सातत्याने करीत आहेत. या प्रकरणात आता राज्यातील एका वरिष्ठ मंत्र्याने लक्ष घातले असून, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात आल्याचे कळते.

मुरूड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीची महत्त्वाची कागदपत्रे गहाळ करून काही संवेदनशील विषय दडपण्याचा प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सखोल चौकशी करण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुरुड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर बुधवारी, १४ जूनला येथील ३०० मालमत्तांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले.

(हेही वाचा – Security Guards : मुंबईतील समुद्र चौपाट्यांवर १२० प्रशिक्षित सुरक्षा रक्षक तैनात)

त्यात मालमत्ता नोंदवहीतील खाडाखोड, चुकीच्या पद्धतीने घरपट्टी लावणे असे प्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे २००५ ते २०२२ पर्यंतचे सर्व दप्तर तपासले जाणार आहे. यातील काही कागदपत्रे यापूर्वीच गहाळ झाली आहेत. ग्रामपंचायतीचा कार्यभार हाती घेताना ही कागदपत्रे उपलब्ध झाली नसल्याचे ग्रामसेवकाने मुरूड पोलिसांना लेखी कळवले आहे. जून २०११ ते नाव्हेंबर २०१७ या कालावधीतील मासिक सभा इतिवृत्त उपलब्ध नसल्याचे त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

‘१९’ बंगल्यांची नोंद

– या प्रकाराची गंभीर दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली असून, कसून चौकशी करावी, असे आदेश जिल्हा परिषदेच्या सीईओंनी मुरूड पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा अहवाल संबंधित मंत्र्याला सादर केला जाणार आहे.
– भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. ठाकरे कुटुंबीयांच्या कथित १९ बंगल्यांची माहिती उद्धव ठाकरे यांनी निवडणूक शपथपत्रात लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. येथील जमिनीवर १९ बंगले असल्याची नोंद ग्रामपंचायतीच्या दप्तरी आहे. त्यामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.