‘गाजर हलवा अर्थसंकल्प’; शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पाचे उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात केले वर्णन

148

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात अनेक मोठ-मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवरून सध्या विरोधक शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका करत आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाचे एका वाक्यात वर्णन केले आहे. गाजर हलवा अर्थसंकल्प असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

नक्की काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

विधिमंडळाबाहेर माध्यमांसोबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या सर्वांना कल्पना आहे, या अर्थसंकल्पा पूर्वीचे दोन ते तीन अर्थसंकल्प हे महाविकास आघाडीच्या सरकारने मांडले होते. त्यावेळेला अजित पवार उपमुख्यमंत्री पदासोबत अर्थ खाते सांभाळत होते. परिस्थिती कशी होती हे आपल्याला माहितेय, कोरोना काळाचे संकट होते. आणि केंद्र सरकार हे काय आमच्या बाजूचे नव्हते. प्रत्येक वेळेला कधी विचारले, तर साधारणतः सरासरी २५ हजार कोटींपेक्षा अधिक जीएसटीची थकबाकी बाकी असायची. आमची अशी अपेक्षा होती की, आता जवळपास सहा महिने झालेले आहेत. महाशक्तीचा पाठिंबा असलेले हे सरकार राज्यात कारभार कसा करतेय हे आपल्याला माहितेय.

मधाचा बोट लावण्याचा प्रयत्न

पुढे ठाकरे म्हणाले की, आज सकाळीच मी एक-दोन शेतकऱ्यांसोबत बोललो, संभाजीनगरमधील शेतकऱ्यांसोबत बोललो. जो मधला अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे झालेल्या नुकसानी संदर्भात या शेतकऱ्यांच्या बांध्यावर अद्याप पंचनामा करण्यासाठी एकही अधिकारी गेलेला नाही. एकूणच हा आजचा अर्थसंकल्प पाहिल्यानंतर सर्व समाजातील घटकांना मधाचा बोट लावण्याचा प्रयत्न झालेला आहे. भावनांशी खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. अवकाळी पाऊस झाला, तसा मुंबईत गडगडातही झाला, पण पाऊस काय पडला नाही. हा जो अर्थसंकल्प आहे, तो गरजेल तो बरसेल काय अशा पद्धतीचा आहे. आणि एका वाक्यात सांगायचे तर गाजर हलवा अर्थसंकल्प असे त्याचे मी वर्णन करेल. कारण यातून बऱ्याशा योजना, आम्ही ज्या जाहीर केल्या, त्याच्यात थोडसे नामांतर करून त्यांनी पुढे मांडलेल्या आहेत. एक गोष्ट बरी आहे, जी योजना आम्ही मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबईत सुरू केली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. ती योजना आमची, त्यावेळेला ह्यांना फिता कापायचे भाग्य मिळायचे आणि तिच योजना आता राज्यभर राबवणार आहे. ठिक आहे, ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या गोष्टी प्रत्यक्षात कधी येतील? हा ही एक प्रश्न आहे.

अर्थसंकल्प वाचताना अनेकदा पंतप्रधान मोदींचा उल्लेख

शेतकऱ्यांना सहा हजारांपासून १२ हजार काय ते मदत करतायत. पण शेतकऱ्यांना हमखास भाव कसा मिळणार? यांच्याबद्दल कुठेही वाच्यता नाही. आमच्या विधानपरिषदेत दीपक केसरकरांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. या अर्थसंकल्पात अनेकदा पंतप्रधानांचा उल्लेख केला. चांगली गोष्ट आहे, मला त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही. जेव्हा पंतप्रधान सत्तेवर येत होते, तेव्हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशी घोषणा केली होती. आता आठ ते नऊ वर्ष झाली, त्याचा कुठेही पता नाही. त्यामुळे परत एकदा सांगतो, हा गाजर हलवा अर्थसंकल्प आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

(हेही वाचा- पुणेकरांसाठी मोठं गिफ्ट; शिंदे-फडणवीस सरकारकडून रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद, याचवर्षी होणार पूर्ण)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.