Ajit Pawar : पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच; अजित पवार पुण्यावर ठाम; राष्ट्रवादीला आपल्याकडचे जिल्हे सोडण्यास शिवसेनेचा नकार

131
  • सुहास शेलार

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या बहुतांश आमदारांनी युती सरकारला पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेना-भाजपामधले इच्छुक बघ्याच्या भूमिकेत आणि राष्ट्रवादीचे ९ आमदार कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेताना दिसले. त्यापाठोपाठ महत्त्वाची खाती पदरात पडून घेण्यात यश मिळाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाप्रमाणे पालकमंत्री पदाचीही फेररचना होण्याची चिन्हे आहेत.

२८ सप्टेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री पदाची यादी जाहीर केली. त्यात अनेकांकडे दोन पेक्षा अधिक जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली. आता मंत्रिमंडळात हिस्सेदार वाढल्यामुळे त्यांच्या खांद्यावरचे ओझे कमी केले जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, भंडारा आणि गडचिरोली असे सहा जिल्हे स्वतःकडे ठेवले होते. त्यातले नागपूर आणि वर्धा वगळता इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री पद नव्या मंत्र्याकडे दिले जाणार असल्याचे कळते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याचे पालकमंत्री पद देऊ नये, अशी स्थानिक भाजपाची मागणी आहे. परंतु, अजित पवारांच्या मनाविरुद्ध जाण्याचे धाडस सध्यातरी देवेंद्र फडणवीस करणार नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटील (पालकमंत्री पुणे) यांच्याकडची जबाबदारी काढून घेतली जाईल. दीपक केसरकर यांच्याकडे कोल्हापूर आणि मुंबई शहरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आहे. त्यापैकी कोल्हापूर चंद्रकांत पाटील यांना देण्याबाबत चर्चा सुरू आहे. मात्र, हसन मुश्रीफ कोल्हापूरसाठी आग्रही असल्याने दुहेरी पेच निर्माण झाला आहे.

(हेही वाचा मोदी-शहांचा विरोध करताना I.N.D.I.A आघाडीकडून भारतमातेचा अवमान; सोशल मीडियात टीकेची झोड)

गिरीश महाजन यांच्याकडे धुळे, लातूर आणि नांदेड या तीन जिल्ह्यांचा कारभार आहे. त्यापैकी लातूर संजय बनसोडे यांना दिले जाईल. सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे चंद्रपूर आणि गोंदिया हे जिल्हे आहेत. ते कायम राहतील. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद उपमुख्यमंत्री किंवा मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेत्याकडे देण्याची प्रथा अलीकडच्या काही वर्षांत पडली आहे. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांना गडचिरोलीची जबाबदारी न मिळाल्यास ते गोंदियावर दावा सांगण्याच्या तयारीत आहेत. अतुल सावे यांच्यावर जालना आणि बीड जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्यातील बीड धनंजय मुंडे यांच्याकडे जाईल, अशी चर्चा आहे. दुसरीकडे, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील या राष्ट्रवादीतील वरिष्ठ मंत्र्यांना कोणते जिल्हे द्यावेत, याबाबतही पेच आहे.

रायगड कोणाचे?

शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्याकडे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी आहे. त्यापैकी रायगडसाठी सुनील तटकरेंच्या कन्या आदिती आग्रही आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या तटकरे यांनी कन्येसाठी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. मात्र, हा जिल्हा राष्ट्रवादीला सोडण्यास शिवसेनेकडून नकार दिला जात आहे. कारण, महाडचे आमदार भरत गोगावले बऱ्याच आधीपासून बाशिंग बांधून बसले आहेत. रायगडच्या पालकमंत्री पदाआडून त्यांची राज्यमंत्री पदावर बोळवण करण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा इरादा आहे.

ठाण्याची जबाबदारी किणीकरांकडे?

मुख्यमंत्री पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या हट्टाखातर ठाण्याचे पालकमंत्री पद भाजपाच्या रवींद्र चव्हाण यांना देण्यात आले नाही. साताऱ्याच्या शंभूराज देसाई यांच्या गळ्यात ही माळ घालण्यात आली. तो राग मनात धरून चव्हाण यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत यांची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरून मधल्या काळात बरेच राजकारण रंगले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करीत सामोपचाराने घेण्याचा सल्ला दिला. तरीही अंतर्गत युद्ध कमी न झाल्याने श्रीकांत यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी कल्याणचा सुभेदार मैदानात उतरवण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे. त्यानुसार अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांना मंत्रिमंडळात घेऊन ठाण्याचे पालकमंत्री पद त्यांना देण्याची व्यूहरचना आखली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.