सुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात येणार, अंधारे यांच्यावर केली जोरदार टीका

131

शिंदे गटातील नेत्यांवर घणाघाती टीका करणा-या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना धक्का देण्याची रणनीती शिंदे गटाकडून आखण्यात येत आहे. सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

अंधारे यांना मी घडवले आहे

सुषमा अंधारे यांच्याकडून शिंदे गटावर करण्यात येत असलेल्या बेधडक टीकेमुळे त्या ठाकरे गटाची तोफ असल्याचे बोलले जात आहे. पण सुषमा अंधारे या मुलुखमैदानी तोफ नसून त्यांना मीच घडवलं आहे, त्यांना वैचारिकरित्या परिपक्व बनवणारा मीच आहे, असे वक्तव्य वैजनाथ वाघमारे यांनी केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखं नेतृ्त्व आज महाराष्ट्राला लाभलं आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीने प्रेरित होऊन मी त्यांच्या शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असे वाघमारे यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘पात्रता आणि विचारधारा नसणा-यांना प्रवेश नको’, सय्यद यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा विरोध)

ही विचारांची लढाई

सुषमा अंधारे यांच्यासोबत आपले कुठलेही मतभेद नाहीत. गेल्या 5-7 वर्षांपासून आम्ही विभक्त राहत आहोत. त्यांना उद्धव ठाकरे यांचे विचार पटले म्हणून त्या तिथे गेल्या, मला एकनाथ शिंदे यांचे विचार आवडतात म्हणून मी त्यांच्या गटात सहभागी होत आहे. त्यामुळे ही विचारांची लढाई आहे, असेही वाघमारे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

त्यांच्या निर्णयाचा आदर-अंधारे

दरम्यान, विभक्त पतीच्या या विधानांवर सुषमा अंधारे यांनी उत्तर दिले आहे. गेल्या 5 वर्षांपासून आम्ही विभक्त आहोत. त्यामुळे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून, त्यांच्या या निर्णयाचा आपण आदर करायला हवा. त्यांच्या राजकीय कारकिर्दीला देखील मी शुभेच्छा देऊ इच्छिते. त्यामुळे त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, अशा शब्दांत सुषमा अंधारे यांनी याबाबत म्हटले आहे.

(हेही वाचाः पंतप्रधानांनी 13 दिवसांपूर्वीच उद्घाटन केलेल्या रेल्वे ट्रॅकवर स्फोट, परिसरात खळबळ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.