शिवसेनेचे नेते संजय राऊत पक्ष कार्यासाठी सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर कडाडून टिका केली. मात्र तरीही पुण्यात राऊत यांच्या या पत्रकार परिषदेच्या ऐवजी एका लग्न समारंभात मनसे नेते वसंत मोरे यांची संजय राऊत यांच्यासोबत झालेली भेट जास्त चर्चेत आली आहे. या भेटीमुळे वसंत मोरे शिवसेनेत जाणार का, अशी चर्चा रंगली आहे.
लग्न समारंभात झाली भेट
राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या सभेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली, तेव्हापासून वसंत मोरे हे नाराज आहेत. त्यांची नाराजी अनेकदा समोर आली होती. तसेच मनसेने मोरे यांना पुणे शहर अध्यक्ष पदावरून हटवले, कोअर कमिटीमधून बाहेर काढले. असे असूनही मोरे यांनी आपण नाराज असलो तरी मनसे सोडून जाणार नाही, असे सांगितले होते. तसेच मोरे यांनी राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर ठाण्यातील सभेत भाषणही केले होते. असे असले तरी वसंत मोरे यांच्या नाराजीचा विषय वारंवार चर्चेत येत राहिला आहे. वसंत मोरे यांच्याकडे पक्षाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र उभे राहिले आहे. अशातच बुधवार, १ जून २०२२ रोजी शिवसेना नेते संजय राऊत पुण्यात असताना वसंत मोरे आणि राऊतांच्या अनौपचारीक भेटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
राऊतांकडून वसंत मोरेंचे कौतुक
पुण्यात एका लग्न समारंभात संजय राऊत यांनी उपस्थिती लावली. याच सोहळ्यात वसंत मोरे देखील उपस्थित होते. दोघेही एकमेकांसमोर येताच संजय राऊत यांनी वसंत मोरे यांना तात्या नावाने हाक मारली. तसेच संजय राऊत यांनी वसंत मोरे यांची गळाभेट घेतली आणि तात्या तुम्ही चांगले काम करत आहात, अशा शब्दांत कामाचे कौतुक देखील केले. ठाण्यातील तुमचे भाषण ऐकल्याचे राऊत यांनी यावेळी वसंत मोरे यांना म्हणाले.
Join Our WhatsApp Community