बंडखोरांमध्येच बंडखोरी होणार! हिंमत असेल तर…, राऊतांनी दिलं चॅलेंज

102

पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात घडत असलेल्या सत्तानाट्यादरम्यान, एकनाथ शिंदे आणि भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी राऊतांनी बंडखोर आमदारांसह एकनाथ शिंदेंना टोला लगावताना म्हणाले, बंडखोरांमध्येच बंडखोरी होऊ शकते. हिंमत असेल तर या गुवाहाटीमधील बंडखोर आमदारांनी राजीनामे द्यावे आणि निवडणुकीला सामोरे जावे, बंडखोर आमदारांनी आपापल्या मतदार संघात निवडून येऊन दाखवावं, असे म्हणत त्यांनी आव्हान केले आहे.

(हेही वाचा – आदित्य ठाकरेंच्या ‘घाण गेली’ या वक्तव्यावर बंडखोर आमदार केसरकरांचे प्रत्युत्तर)

बंडखोरी कुठे होणार हे लवकरच कळेल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेवर जनतेचा विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरेंचे भक्त आहोत असं सांगून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. बाळासाहेबांच भक्त असं खंजीर खुपसायचं काम करत नाहीत. त्यामुळेच बंडखोरी नेमकी कुठे होणार हे लवकरच कळेल, असे सूचक वक्तव्य मुंबईत बोलत असताना राऊत यांनी केलं आहे.

शिवसैनिक मुख्यमंत्री होतो याचा आनंद होईल

पुढे राऊत असेही म्हणाले की, अडीच वर्ष मलाईदार खाती होती तेव्हा नाही आठवला अन्याय, या बंडखोरांचे बाप अनेक आहेत पण आमचा बाप एकच आहे, बाळासाहेब ठाकरे. महाविकास आघाडी सरकार हे पडणार नाही, याची आम्हाला शाश्वती आहे. त्यामुळे बंडखोर आमदार मुंबईत येण्याचे धाडस करत नाहीये. जर का एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचे आहे, तर भाजपने सांगावे. आम्हालाही शिवसैनिक मुख्यमंत्री होतो याचा आनंद होईल. मात्र २०१९ ला भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनीच शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले नव्हते, आजही ते तसं करू इच्छित नाहीत. मराठी माणूस आणि शिवसेनेला संपवण्याचा त्यांचा डाव असल्याचा आरोप राऊतांनी भाजपवर केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.