Shiv Sena UBT : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला कल्याणमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवणाऱ्या वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाच्या कल्याणमधील संघटनात्मक ताकदीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. (Shiv Sena UBT)
सूत्रांच्या माहितीनुसार, वैशाली दरेकर यांनी आपल्या राजीनाम्याचे पत्र पक्ष नेतृत्वाकडे पाठवले आहे. पक्षांतर्गत कामकाज, संघटनात्मक पातळीवरील नाराजी आणि काही निर्णयप्रक्रियांबाबत असमाधान असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. “वैयक्तिक कारणामुळे आपण कामाला वेळ देऊ शकत नाही…” असा उल्लेख करत, एका पत्राद्वारे त्यांना आपला राजीनामा पक्षप्रमुखांकडे सुपूर्द केला आहे.
पत्रात नेमकं काय म्हटलंय?
”साहेब, मी वैशाली दरेकर राणे, महिला जिल्हासंघटक या पदावर दोन वर्षापासून कार्यरत आहे. परंतु, सध्या माझ्या वैयक्तिक कर्तव्यांमुळे मी सदर पदाला न्याय आणि वेळ देऊ शकत नाही. म्हणून, माझ्या महिला जिल्हा संघटक या पदाचा मी स्वेच्छेने राजीनामा देत आहे, त्याचा स्विकार करावा ही विनंती,” असा मजकूर वैशाली दरेकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहिला आहे. (Shiv Sena UBT)
लोकसभा निवडणुकीत वैशाली दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांना थेट आव्हान दिले होते. निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी त्यांनी ठाकरे गटाच्या प्रमुख महिला चेहऱ्यांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली होती.
दरम्यान, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. त्या अन्य कोणत्या पक्षात प्रवेश करणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. (Shiv Sena UBT)
दुसरीकडे, ठाणे जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षसंघटना अधिक बळकट करण्यासाठी तसेच नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर ‘मातोश्री’वर आयोजित बैठकीत मोठा गोंधळ उडाल्याची माहिती समोर आली आहे. उपलब्ध माहितीसमोर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतच ठाण्यातील दोन गटांतील पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक झाली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्याची माहिती समोर आली आहे.
कळवा आणि कल्याण विधानसभा मतदारसंघांतील पक्षसंघटनेचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, कल्याणमधील काही पदाधिकाऱ्यांच्या हकालपट्टीच्या मुद्द्यावरून वातावरण तापले आणि त्याचेच रूपांतर वादात झाले अशी चर्चा सध्या रंगते आहे.(Shiv Sena UBT)
हेही पाहा:
Join Our WhatsApp Community


