माफीचा साक्षीदार झाल्याने सचिन वाझे सुटणार आणि अनिल देशमुख अडकणार का?

123

सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे मागील सहा महिन्यांपासून कारागृहात आहेत. त्यांच्यावर पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार आणि बार मालकांकडून खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हा माफीचा साक्षीदार होणार आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. हा माफीचा साक्षीदार म्हणजे काय, कुणाला माफीचा साक्षीदार होता येते, माफीचा साक्षीदाराने दिशाभूल केली तर काय होते, या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या अडचणी कशा वाढतील आदी प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबई उच्च न्यायालयाने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला देशमुख यांच्यावरील खंडणीच्या प्रकरणात माफीचा साक्षीदार होण्यास परवानगी दिली आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार केल्यासंबंधी पत्र लिहिले होते. सचिन वाझे यानेही त्याच पत्राची ‘री’ ओढत कबुली दिली. वाझे आता या प्रकरणात माफीचा साक्षीदार झाला आहे. गेल्या आठवड्यात वाझेने याविषयावरील याचिका दाखल केली होती. भारतीय दंड संहितेच्या कलम 306 नुसार त्यांना साक्षीदार करण्यात आले. सध्या वाझेवर 9 खटले सुरू आहेत. माफीचा साक्षीदार झाला तरी अन्य प्रकरणात त्याला तुरुंगातच रहावे लागणार आहे.

(हेही वाचा देशभरात साडेसहा लाख मंदिरे! महाराष्ट्रात किती? आयआयटी प्राध्यापकांच्या अहवालातील माहिती)

कोण होतो माफीचा साक्षीदार?

अत्यंत थंड डोक्याने, पुरावे सोडून न देता शिताफीने जे गुन्हे केले जातात. जिथे गुन्हा घडत असतो तेव्हा तिथे गुन्हेगारांशिवाय कोणतीही दुसरी व्यक्ती घटनास्थळी उपस्थित नसते. अशा वेळी न्यायालयात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावा आणि साक्षीदारांची गरज असते. ज्या गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी गुन्हा सिद्ध करण्यासाठी कोणताही स्वतंत्र पुरावा अथवा साक्षीदार उपलब्ध नसतो, त्यावेळी माफीचा साक्षीदार तयार केला जातो. मुख्य न्यायदंडाधिकारी, सत्र न्यायालयाचे न्यायाधीश, उच्च/सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आरोपीस माफीचा साक्षीदार करण्याची परवानगी देऊ शकतात.

माफीचा साक्षीदार म्हणजे कोण?

गुन्हे घडल्यानंतर पोलीस काही संशयित गुन्हेगारास पकडतात आणि चौकशी सुरू करतात. पण पुरेसा सबळ पुरावा व साक्ष नसल्यामुळे काही वेळेस गुन्हेगारांना शिक्षा होत नाही व न्यायालयात पुराव्या अभावी गुन्हेगारास सोडून दिले जाते. त्यावेळेस माफीचा साक्षीदार झालेला गुन्हेगार मदतीस येतो. माफीचा साक्षीदार म्हणजे जी व्यक्ती गुन्हा करते, गुन्हा होण्यास प्रवृत्त करते, गुन्हेगाराला गुन्ह्यांत मदत करते किंवा चिथावणी देते, गुन्हेगाराला संरक्षण देते किंवा त्यांना गुन्ह्याच्या स्थानापासून पळून जाण्यास मदत करते अर्थात अशी व्यक्ती जी गुन्ह्याचा साक्षीदार आहे, बेकायदेशीर कृतीशी किंवा गुन्ह्याशी जोडलेला आहे, त्याचा गुन्ह्यामध्ये सक्रिय किंवा असक्रिय सहभाग आहे आणि त्या व्यक्तीने या गुन्ह्यात त्याच्या सक्रिय किंवा असक्रिय सहभागाची कबुली दिली आहे. मात्र कोणत्याही गुन्ह्यात असाच गुन्हेगार माफीचा साक्षीदार होतो जिचा गुन्ह्यात कमीत सहभाग असेल, मात्र गुन्ह्याविषयी सर्व माहिती आहे. ज्या गुन्हेगारांवर जास्त व भयंकर गुन्ह्यांची नोंद आहे त्याला माफीचा साक्षीदार केला जाऊ शकत नाही. पोलीस चौकशीत किंवा न्यायालयात आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली व स्वत: त्या आरोपीबरोबर असणाऱ्या इतर गुन्हेगारांची नावे व गुन्हा कसा कधी कुठे घडवला याची तपशीलवार माहिती दिली तर तो आरोपी माफीचा साक्षीदार होऊ शकतो. आणि अशा रीतीने फिर्यादीचा सक्षम साक्षीदार होऊ शकतो.

खोटी साक्ष दिल्यास काय होते?

माफीच्या साक्षीदारावर सहसा विश्वास ठेवणे धोकादायक असू शकते. आणि जेव्हा हा खटला अपीलमध्ये जातो तेव्हा खटल्यात त्रुटी असल्यास न्यायालय हा निर्णय रद्द करू शकते. काही वेळा हा माफीचा साक्षीदार उलटा फिरू शकतो आणि स्वतः साक्ष बदलू शकतो किंवा खोटी शपथ घेऊ शकतो. माफीच्या साक्षीदाराने जर खोटी साक्ष किंवा पुरावा दिला तर त्याला वरील गुन्ह्याखाली व खोटी साक्ष देण्याच्या गुन्ह्याखाली अटक व शिक्षा होऊ शकते. यासाठी सरकारी वकीलाने उच्च न्यायालयात अर्ज करणे आवश्यक असते.

(हेही वाचा पीएफआयची २३ खाती ईडीकडून सील, मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून कोट्यवधींचा व्यवहार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.