युतीत मिठाचा खडा; ‘त्या’ जाहिरातीवरील प्रवीण दरेकरांची नाराजी व्यक्त

148
युतीत मिठाचा खडा; 'त्या' जाहिरातीवरील प्रवीण दरेकरांची नाराजी व्यक्त
युतीत मिठाचा खडा; 'त्या' जाहिरातीवरील प्रवीण दरेकरांची नाराजी व्यक्त

सर्वच प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर मंगळवारी झळकलेल्या जाहिरातीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ असा उल्लेख असलेल्या जाहिरातीने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. या जाहिरातीमध्ये एका सर्वेक्षणाचा दाखला देऊन राज्यातल्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती दर्शवल्याचे सांगितले आहे. या जाहिरातीवर राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता भाजप नेते प्रवीण दरेकरांनी या जाहिरातीवर नाराजी व्यक्त केली आहे.

एका मराठी खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, ‘मला वाटतं, केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत, ही वस्तुस्थिती आहे, आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे हे आमचे युतीचे मुख्यमंत्री आहेत, ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्या ठिकाणी एखाद्या संस्थेने सर्वे केला आणि त्या सर्वेतून काही टक्क्यांनी पसंती येऊन लोकप्रियता आली असेल, त्याच्याविषयी काही असुया नाही किंवा वाईट वाटायचं कारण नाही. शेवटी ते आमचे मुख्यमंत्री आहेत, युतीचे मुख्यमंत्री आहेत. पण त्या सर्वेचा आधार घेऊन देवेंद्रजींची लोकप्रियता कमी आहे, अशा प्रकारे दाखवण्याचा उद्देश काय? याची सल निश्चित आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. त्यांना जाहिरात द्यायची आहे, एकट्याची दिली तर काही हरकत नाहीये. लोकप्रिय आहेत, काही समस्या नाही, आम्हालाही आनंद आहे. शेवटी लोकप्रियता ही लोकं ठरवतं असतात. आज पंतप्रधानांची लोकप्रियता कुठल्या सर्वेने नाहीतर जनतेने ठरवलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांची लोकप्रिय गेले ८ ते १० वर्ष अबादित आहे. ५ वर्ष म्हणून त्यांची मुख्यमंत्री पदाची कारकिर्द देदिप्यमान झाले. विरोधी पक्षनेते म्हणून कोविडचा काळ असो, निसर्ग वादळ असतो, तौक्ते वादळ असो, आपत्ती असतो, ग्राऊंटवर ठामपणे उभे राहिलेत. आता १० महिन्यांच्या कालावधीमध्ये अर्थमंत्री म्हणून दिलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा, आधार देणारा वाटला. आणि या सगळ्यात त्यांचीही लोकप्रियता वादातीत आहे. पण जाणीवपूर्वक असा प्रयत्न कोणी करत असेल, तर ते दुर्दैवी आहे. जर कोणी नटखटपणा करणार असेल तर आम्ही खपवून घेणार नाही.’

(हेही वाचा – भाजप, शिवसेना आणि आरपीआयची महायुती यशस्वी होतेय हे दाखवणारी ही जाहिरात – उदय सामंत)

‘भाजप हा जगातला मोठा पक्ष आहे, देशातला तर आहेच, सर्वाधिक सत्ता असणाऱ्यांमधला पक्ष आहे. आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाने मग आमचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, जेपी नड्डा साहेब असतील किंवा अमित शहा असतील यांनी राज्यातील नेतृत्व देवेंद्र फडणवीस करणार हे ठरवलेलं आहे. म्हणून केंद्रात नरेंद्र मोदी साहेब आणि राज्यात आमचे नेते देवेंद्र ही आमची स्पष्ट भूमिका आहे. यामध्ये दुसरा काही विषय किंवा अडचण येण्याचा विषयचं नाहीये. परंतु कदाचित काही लोकांना युतीचा कारभार बगवत नसेल. मग हा कोणी कट रचलाय का? कोण मीठाचा खटा टाकतंय का? आणि अशाप्रकारे देवेंद्रजींना कमीपणाचं दाखवून विसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न आहे का? अशा शंका येतायत. मला वाटतं, जबाबदार असलेल्या सत्तेतल्या पक्षाने याठिकाणी अशाप्रकारे झालं असेल तर ते योग्य नाही. कोणी केलं असेल तर त्याला खतपाणी घालणं योग्य नाही. आणि ते युतीच्या दृष्टीनं चांगलं नाही आणि योग्य नाही,’ असं म्हणतं प्रवीण दरेकरांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.