हैदराबाद मुक्ती संग्राम : भाजपा आणि TRS येणार आमनेसामने

92

भाजपाने ‘तेलंगाना’ मध्ये आपले राजकीय बस्तान बसवण्याची रणनीती सुरू केली आहे. त्याची सुरुवात शनिवार, १७ सप्टेंबर रोजी हैद्राबाद मुक्ती संग्रामपासून होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यासाठी शुक्रवार, १६ सप्टेंबर रोजीच हैदराबाद येथे पोहचणार आहेत. परेड ग्राउंड येथे आयोजित कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही जन्मदिवस आहे. भाजपा पंतप्रधान मोदी यांचा जन्मदिवस आणि हैद्राबाद मुक्ती संग्राम या दोन दिवसांची सांगड घालून तेलंगणामध्ये राजकीय प्रस्थ निर्माण करण्याचा भाजपा प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे तेलंगणा राष्ट्रवादी समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे मात्र भाजपाच्या हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने तेलंगणाच्या राजकारणात चंचू प्रवेश करण्याच्या मनसुब्याला विरोध करणार आहेत. मुख्यमंत्री राव यांच्या मते हा दिवस हैदराबाद मुक्ती संग्राम नाही तर तेलंगणा मुक्ती दिवस आहे.

मुक्ती संग्राम भाजपासाठी राष्ट्रवाद TRS साठी समाजवाद 

अमित शहा यांच्या दौऱ्यात ते हैदराबादमध्ये दिव्यांगांच्या एका खास कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. तिथे दिव्यांगांना आवश्यक उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत, तर सरकारी शाळा आणि सामुदायिक वसतिगृहांमध्ये शौचालय साफसफाईची यंत्रे वितरित केली जाणार आहेत. यानंतर केंद्रीय गृहमंत्री शहा हे राष्ट्रीय पोलीस अकादमीतील ‘हुतात्मा स्मारक’ येथे जाणार आहेत. या सर्व कार्यक्रमांतून अमित शहा मुख्यमंत्री केसीआर यांना लक्ष्य करतील, तसेच २०२३ मध्ये होणाऱ्या तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीचीही रणनीती ठरवतील, अशी माहिती आहे. भाजपा उद्याच्या दिवसाला हैदराबाद मुक्ती संग्राम असे संबोधित करताना भाजपा हा संग्राम म्हणजे हिंदुत्ववाद, राष्ट्रवाद होता, जो निजामाच्या मुस्लिम राजवटीच्या विरोधात निर्णायक ठरला, असे बिंबवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याला तेलंगणा राष्ट्रवादी समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विरोध करणार आहेत. हा भाजपाचा धर्मांधपणा आहे, असे सांगत हा कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालील तेलंगणातील लोकांचा सशस्त्र संघर्ष हा मुस्लिम नेत्याविरुद्ध हिंदू जनतेचा उठाव नव्हता. हक्कापासून वंचित असलेल्या जनतेने निजामाकडे आश्रय घेतलेल्या जमीनदारांच्या सरंजामशाही, दडपशाही, शोषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी शस्त्रे हाती घेतली होती, अशी भूमिका मांडत या दिवसाला मुळात हैदराबाद मुक्ती संग्राम म्हणतच नाही, या दिवसाला तेलंगणा मुक्ती दिवस असेच संबोधले जाते, अशी भूमिका मुख्यमंत्री राव यांनी मांडली आहे.

(हेही वाचा देशातील ७० मंदिरे सरकारमुक्त होणार? पंढरपूरपासून सुरुवात…)

तेलंगणातील राजकीय स्थिती

दक्षिण भारतात भाजपला आतापर्यंत मोठे यश मिळालेले नाही. कर्नाटक वगळता अन्य कोणत्याही राज्यात भाजपच्या हाती फार काही लागले नाही. तेलंगणात २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या खात्यात फक्त एक जागा आली. तेलंगणा राष्ट्रवादी समितीने ४६.८७ टक्के मतांनी सरकार स्थापन केले. काँग्रेस पक्षाला २८.४३ टक्के मते मिळाली, तर चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाला ३.५१ टक्के आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमला २.७१ टक्के मते मिळाली. भाजपाला ६.९८ टक्के मते मिळाली. २०२३ मध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यानंतर पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. २०१९ मध्ये भाजपने पहिल्यांदा लोकसभेच्या चार जागा जिंकल्या होत्या. भाजपने २० टक्के मते मिळवली होती. तेलंगणा राष्ट्रवादी समितीला नऊ आणि काँग्रेस पक्षाकडे लोकसभेच्या तीन जागा होत्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.