Mahavikas Aghadi मध्ये बिघाडी करणार ‘हे’ टॉप १० मतदार संघ

198
Mahavikas Aghadi मध्ये बिघाडी करणार 'हे' टॉप १० मतदार संघ
Mahavikas Aghadi मध्ये बिघाडी करणार 'हे' टॉप १० मतदार संघ
  • सुजित महामुलकर

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांपैकी १७ जागांवरील उमेदवार महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना उबाठा पक्षाने  बुधवारी, २७ मार्चला जाहीर केले. या यादीसह एकूणच आघाडीत बिघाडी करणारे असे टॉप १० मतदार संघ आहेत, जिथे लढण्याआधीच महाविकास आघाडी पडणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी १७ उमेदवारांची यादी ‘X’ या समाज माध्यमावर पोस्ट केली आणि ‘मविआ’मधील (Mahavikas Aghadi) लपून राहिलेला वाद उघड झाला.

पडसाद मुंबईपासून दिल्लीपर्यंत

यादी बाहेर येत नाही, तोच काही मिनिटात त्याचे पडसाद मुंबईपासून दिल्लीपर्यंत उमटले. राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याच पक्ष कार्यालयावर घोषणाबाजी करत मुंबईत किमान एक तरी जागा पक्षाने लढवावी आणि ईशान्य मुंबई मतदार संघातून पक्षाच्या राखी जाधव यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली. त्यावेळी शरद पवार पक्ष कार्यालयात उपस्थित होते. (Mahavikas Aghadi)

ईशान्य मुंबईच नाही, तर सांगली, नाशिक, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, संभाजीनगर, मुंबई उत्तर-मध्य, कल्याण-डोंबिवली, रामटेक आणि हिंगोली अशा अन्य मतदार संघातही आघाडीचा बोजवरा उडणार असल्याची चिन्हे आहेत.

(हेही वाचा Mumbai South Central Lok Sabha Constituency : दक्षिण मध्य मुंबईत शेवाळे विरुद्ध देसाई, कोण ठरेल सरस?)

कॉँग्रेसचा वसंतदादा पाटलांच्या नातवासाठी आग्रह

सांगलीचा वाद तर थेट दिल्लीच्या कॉँग्रेस हाय-कमांडपर्यंत पोहोचला. सांगलीच्या जागेवरून शिवसेना उबाठा आणि कॉँग्रेसमध्ये वाद विकोपाला जाण्याचीही चिन्हे आहेत. सांगली मतदार संघात उबाठाने कॉँग्रेसला विश्वासात न घेता परस्पर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच पलुस-कडेगावचे आमदार आणि सांगली कॉँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्यासह विशाल पाटील यांनी थेट दिल्ली गाठली. कॉँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला जात आहे. विशाल हे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू असून कॉँग्रेसला त्यांच्या विजयाची खात्री असल्याने त्याच्या नावासाठी कॉँग्रेसकडून जोर लावला जात आहे.

उबाठाचा अंतर्गत वाद उफाळला

नाशिकमध्ये शिवसेना उबाठात अंतर्गत वाद उफाळला आहे. या जागेसाठी माजी आमदार विजय करंजकर यांचे नाव पक्षाकडून जवळपास निश्चित झाले असताना अखेरच्या क्षणी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. करंजकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पक्षाने सहा महिन्यापूर्वी काम सुरू करायला सांगितले आणि आता सगळा मतदार संघ पिंजून काढल्यावर दुसऱ्याला उमेदवारी जाहीर केली. (Mahavikas Aghadi)

कॉँग्रेसकडून उघड टीका

मुंबई उत्तर-पश्चिम मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी घोषित झाली. कीर्तिकर यांचे नाव खिचडी घोटाळ्यात असल्याने कॉँग्रेसने या जागेवर दावा केला होता, मात्र उबाठाने कॉँग्रेसला न विचारता उमेदवारी जाहीर करून टाकली. यावर संजय निरुपम यांनी उबाठावर प्रचंड संताप व्यक्त करत उघड टीका केली. मुंबई दक्षिण-मध्य या मतदार संघवरही उबाठाने उमेदवार दिल्यानंतर आता कॉँग्रेसने दावा केला. उबाठाकडून अनिल देसाई यांची उमेदवारी घोषित केली असून कॉँग्रेसने माजी मंत्री वर्षा गायकवाड या प्रभावी उमेदवार असल्याचा दावा केला.

(हेही वाचा BJP Seventh list : भाजपाची सातवी यादी जाहीर, अमरावती लोकसभा मतदारसंघात नवनीत राणा यांना उमेदवारी)

कल्याणमध्ये ‘मविआ’ला उमेदवार मिळेना

संभाजीनगरमधून उबाठाने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि उबाठा आमदार अंबादास दानवे नाराज असल्याची चर्चा आहे. तशी कबुली दानावे यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. आजही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते २०१४, २०१९ ला लोकसभेसाठी इच्छुक होते आणि आताही २०२४ लाही त्यांची लोकसभा लढवण्याची इच्छा होती. हिंगोली मतदार संघ कॉँग्रेसकडे होता तो आता शिवसेना उबाठाने ताब्यात घेतला. तर शिवसेना उबाठाने दावा केलेल्या कल्याण-डोंबिवली या मतदार संघात अद्याप उमेदवार न दिल्याने कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ‘मविआ’ला उमेदवार मिळत नाही, अशी चर्चा महाविकास आघाडीत दबक्या आवाजात होत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.