नवीन वस्त्रोद्योग धोरण : लवकरच बैठक घेवून अंतिम निर्णय, सुधारित जीआर काढणार – चंद्रकांत पाटील

राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, सहकारी सुतगिरण्या, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योगातील इतर घटकांच्या अडचणींबाबत समितीची मंत्रालयात बैठक झाली.

169
नवीन वस्त्रोद्योग धोरण : लवकरच बैठक घेवून अंतिम निर्णय, सुधारित जीआर काढणार - चंद्रकांत पाटील

राज्य शासनाने नुकतेच राज्याचे पाच वर्षांसाठीचे नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. धोरण जाहीर झाल्यानंतर सहकारी सुतगिरण्या, यंत्रमाग आणि इतर घटकांच्या विविध मागण्यांना वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज राज्यस्तरीय बैठक घेवून तत्वत: मान्यता दिल्याची माहिती त्यांनी दिली. या मागण्यांबाबत एकत्रित प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेवून अंतिम निर्णय घेतला जाईल. त्यानंतर सुधारित शासन निर्णय काढले जाईल, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्याच्या एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण, सहकारी सुतगिरण्या, यंत्रमाग आणि वस्त्रोद्योगातील इतर घटकांच्या अडचणींबाबत समितीची मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला आमदार प्रकाश आण्णा आवाडे, अमरीश पटेल, डॉ.नितिन राऊत, सुनिल केदार, जयकुमार रावल, राजेंद्र पाटील -यड्रावकर, विश्वजीत कदम, रईश शेख, राजूबाबा आवळे, के.पी. पाटील, प्रताप अडसळ, महेश चौघुले, जयदत्त क्षीरसागर, लक्ष्मण ढोबळे, पृथ्वीराज देशमुख, वस्त्रोद्योग विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी, सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा – आंबेनळी घाटातल्या कालिका माता पॉईंटजवळ कोसळली दरड, घाट वाहतुकीसाठी बंद)

नवीन वस्त्रोद्योग धोरणाबाबत झालेल्या बैठकीत जोपर्यंत सौरऊर्जा प्रकल्पातील अटी दूर होणार नाहीत तोपर्यंत वीज अनुदान चालू राहील. प्रती वस्त्रोद्योग घटक मासिक वीज अनुदान वितरणावर ४० लाख रुपये वीज अनुदान वितरण मर्यादेची अट रद्द करण्यात येईल. सर्व झोनसाठी भागभांडवल योजनेतील फरक कमी करण्यात येईल. विदर्भासाठी ४५ टक्के व इतरांसाठी ४० टक्के ठेवण्यात येईल. भांडवली अनुदान पूर्ववत देण्यात येईल. महा टफ्फ योजनेत सर्व झोनसाठी सूतगिरण्यांच्या आधुनिकीकरणासाठी समान ४० टक्के अनुदान देण्यात येईल. सहकारी सूतगिरण्या आणि यंत्रमाग संस्थांचे दंडव्याज माफ करण्यात येईल. आजारी सूतगिरण्या किंवा बंद असलेल्या सूतगिरण्यांच्या पूनर्वसनासाठी योजना बनविण्यात येईल. सूतगिरणीच्या सातबारावर बोजा चढविण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात येईल. वीज सवलतीसाठी एनपीएची अट रद्द करण्यात येईल, असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

सहकारी सूतगिरण्यांच्या अडचणींबाबत झालेल्या बैठकीत सौरऊर्जा प्रकल्पाबाबत पुन्हा अभ्यास करुन अहवाल तयार करण्यात येईल. १० टक्के कापूस अनुदानाऐवजी प्रति चाती पाच हजार किंवा १२ टक्के व्याज अनुदान योजनेला मान्यता देण्यात येईल. जो पर्यंत सूतगिरण्या सौरऊर्जेवर कार्यान्वित होणार नाही तोपर्यंत वीज अनुदान सुरु राहिल. भांडवली अनुदान पूर्ववत करण्याबाबत धोरणामध्ये सुधारणा करण्यात येईल. नवीन सूतगिरणी नोंदणी करताना सभासदांची संख्या एक हजार ऐवजी २०० करण्यात येईल. वैयक्तिक तारणाची पाच किंवा दहा टक्के संचालकांची अट रद्द करण्यात येईल. आधुनिकीकरण, पूनर्वसनासाठी शासनस्तरावर योजना बनविण्यात येईल.

यंत्रमाग व इतर वस्त्रोद्योग घटकांच्या झालेल्या बैठकीत २७ अश्वशक्ती (हॉर्सपॉवर) यंत्रमागासाठी अतिरिक्त ०.७५ पैसे प्रतियुनिट वीज सवलत मंजूर करण्यात येईल. यंत्रमागासाठी ज्यांना सौरऊर्जा प्रकल्प बसविणे शक्य आहे त्यांना मदत करण्यात येईल तसेच जे बसविणार नाहीत त्यांना वीजदर अनुदान चालू राहिल. खर्चीवाल्या यंत्रमागासाठी मजुरी देण्याबाबत योजना बनविण्यात येईल. यंत्रमाग धारकांच्या वीजबिलातील पोकळ व्याज माफ करण्यात येईल, असे महत्त्वपूर्ण निर्णयांना या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली.

समितीच्या झालेल्या या चर्चेतून सकारात्मक निर्णय घेवून राज्य शासनाने वस्त्रोद्योग घटकांना मदत केली आहे, त्यामुळे सहकारी वस्त्रोद्योग महासंघाने सुतगिरण्या बंद करण्याचा निर्णय रद्द केल्याचे महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी जाहीर केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.