BJP : २०२४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी मोडणार राजीव गांधींचा रेकॉर्ड

226

नवीन वर्षे हे लोकसभा निवडणुकांचे आहे. यामुळे केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाने रणनीती तयार केली आहे. मात्र आघाडीवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने (BJP) तब्बल सव्वा चारशे जागांचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी मोदी शाह यांची जोडी जोमाने कामाला लागली आहे. यामुळे मोदी माजी पंतप्रधान राजीव गांधींचा रेकॉर्ड मोडणार का? असा प्रश्न राजधानीच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

कॉंग्रेसला 1984 मध्ये सव्वा चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या  

माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसला 1984 मध्ये सव्वा चारशेपेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2024च्या निवडणुकीत नेमका हाच रेकॉर्ड मोडून काढायचा आहे. मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाचे (BJP) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. 2024 मधील लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला 2019 पेक्षाही मोठा विजय मिळवायचा आहे, असे ते यावेळी म्हणाले होते. मुळात, मोठा विजय म्हणजे नेमका कसा विजय? हे तेव्हा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना कळले नव्हते. परंतु, आता पंतप्रधानांच्या या वाक्याचा अर्थ उलगडू लागला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर 1984 मध्ये लोकसभेची जी निवडणूक झाली होती, त्यात कॉंग्रेसला 425 पेक्षा जास्त जागा मिळाल्या होत्या. हा विक्रम माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या नावावर आहे. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती आणि सहानुभूतीच्या लाटेत कॉंग्रेसचे 425 पेक्षा जास्त खासदार निवडून आले होते.

(हेही वाचा Supriya Sule यांचा बारामतीत मुक्काम; रुपाली चाकणकर म्हणाल्या, ”अजित पवार सोबत नसल्याने…”)

मोदी आणि शहा जोडीचा निश्चय 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजीव गांधी यांच्या नावावर असलेला नेमका हाच रेकॉर्ड मोडून आपल्या नावावर याहीपेक्षा मोठ्या विक्रमाची नोंद करावयाची आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपचे (BJP) तमाम रणनीतीकार आणि नेते हे लक्ष्य कसे गाठता येईल? याची गोळाबेरीज करीत असल्याची चर्चा आहे. यात किंचितही दुमत नाही की, मोदी आणि शहा यांची जोडी केवळ कल्पना करीत नाही तर त्यासाठी जीव ओतून काम करतात. अभेद्य योजना आखतात आणि तेवढ्याच तन्मयतेने अंमलबजावणी सुध्दा करतात. गुजरात आणि अलिकडेच संपन्न झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड निवडणुकीचा निकाल या गोष्टीचे साक्षीदार आहेत. गुजरातमध्ये पूर्ण मंत्रिमंडळ बदलले होते तर पाच राज्यांच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि खासदारांना विधानसभेत उतरविले होते. थोडक्यात सांगायचे एवढेच की, भाजपची योजना ही अभेद्य असते.

भाजप जुने विक्रम मोडून काढण्याची योजना आखतेय  

लोकसभा निवडणुकीची घोषणा व्हायला आता जेमतेम तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. एकीकडे भाजप (BJP) जुने विक्रम मोडून काढण्याची योजना आखत आहे, तर दुसरीकडे ‘इंडी’ आघाडी खरंच एकजूट आहे काय? यावरही शंका घेतली जात आहे. इंडिया आघाडीची पहिली बैठक बोलविणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांची संयोजक होण्याची इच्छा होती. परंतु, संयोजक बनविण्याऐवजी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनविण्याचा प्रस्ताव मांडला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. यानंतर नितीशकुमार नाराज झाले नसते तरच नवल! आता या नाराजीचा फायदा आपल्याला लोकसभेच्या आगामी निवडणुकीत कसा होईल? याची रणनिती आखण्याचे काम भाजपचे चाणक्य करीत आहेत. भाजपच्या (BJP) एका ज्येष्ठ नेत्याने रालोआत परत येण्याचे आवाहन सुशासनबाबू यांना केले असल्याची सुध्दा चर्चा आहे. एकूणच 2024 हे वर्षे राजकीय दृष्टीने अतिशय महत्वाचे असणार आहे. जनता कुणाला साथ देते यावर राजकीय पक्षाचे भविष्य अवलंबून असणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.