Mumbai-Goa Highway : सरकार आता तरी शब्दाला जागणार का?

103
  • नित्यानंद भिसे 

नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई-दिल्ली महामार्ग यांसारख्या राज्याच्या आर्थिक राजधानीला विविध शहरांशी वेगवान पद्धतीने जोडणाऱ्या या महामार्गांचे पहिले टप्पे प्रवासी वाहतुकीसाठी खुले झाले. पण, मागील एका तपापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम कासवगतीनेच सुरु आहे. राज्य सरकारने हा महामार्ग पूर्ण होण्याची नवीन डेडलाईन दिली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत हा महामार्ग सुरु होईल असे सरकारने सांगितले आहे. पण सध्या या महामार्गाची जी अवस्था आहे हे पाहता ही डेडलाईन पाळली जाईल का, हे पहावे लागेल.

सध्या कोकणातील सर्वात आवडत्या गणेशोत्सवाची चर्चा सुरु आहे. त्यासाठी चाकरमानी गावाला जाण्याच्या तयारीत आहेत. मात्र ज्या रस्त्यावरून ते जाणार आहेत, तो महामार्ग तितका चांगल्या स्थितीत आहे का, असा प्रश्न आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही, म्हणून कोकणवासी निराश आहेत. परंतु, सरकारने आता या महामार्गाच्या कामाचे शेवटच्या टप्प्याचे काम सध्या हाती घेतल्यामुळे कोकणवासीयांच्या आशा पुन:पल्लवित झाल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्ग (एनएच-६६) हा रस्ता नवी मुंबईतील पनवेलपासून दक्षिण गोव्यातील पोलेमपर्यंत एकूण ४७१ किमी लांबीचा आहे. या महामार्गावर चार मार्गिकांच्या रुंद रस्त्याचे बांधकाम सुरु आहे. खरंतर या प्रकल्पाचे काम २०११ साली सुरू झाले.

महामार्गाला नवीन डेडलाईन 

या महामार्गाच्या रुंदीकरण कामाकरिता जमिनीचा ताबा मिळविणे आणि त्याची जमीनमालकांना नुकसानभरपाई देणे तसेच इतर अनेक अडचणींमुळे रस्त्याच्या कामांना फार विलंब झाला. परंतु, हे काम आतापर्यंत ७० टक्के पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम मोठ्या वेगाने सुरू आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या कामात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामांकरिता अनेक ठेकेदार काम करीत आहेत. जे ठेकेदार वेगाने काम करीत नाहीत, त्यांच्या जागी आता बदलून नवीन ठेकेदारांची नेमणूकही सरकारने केली आहे. त्यामुळे सर्व कामे व्यवस्थित मार्गी लागली, तर डिसेंबर २०२३ मध्येच हा प्रकल्प पूर्ण होईल, अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. या मार्गाचे काम पनवेलला सुरू होऊन पेण, माणगाव, महाड, पोलादपूर, खेड, संगमेश्वर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, पणजी, काणकोण, मारगाव ही ठिकाणे रस्त्याच्या आखणीमध्ये आहेत. या आखणीमुळे मुंबई-गोवा महामार्ग प्रवासाचा वेळ तीन तासांनी कमी होणार असून रस्ते प्रवासाची सुरक्षा अबाधित राहते. अपघात कमी होतील, अशा पद्धतीने हा महामार्ग बांधला जात आहे.

रस्ता अर्धवट झाला तरी वापरण्यास सुरुवात 

दु:खाची बाब अशी की, या महामार्गाचे काम सुरू केल्यापासून ऑगस्ट २०२३ पर्यंत १२ वर्षांच्या काळात मुंबई-गोवा रस्त्यावरच्या प्रवासात २,५०० अपघात झाले आणि ६०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला. याचे कारण कदाचित रस्त्याचे काम पूर्ण व्हावयाच्या आतच त्याचा वापर सुरु झाला. या कामाला सुरुवात होऊन १२ वर्षे झाली, तरी काम पूर्ण होण्याची शक्यता दिसली नाही. म्हणून मग प्रवाशांनी हा रस्ता वापरण्यास सुरुवात केली असावी. हा महामार्ग पळसपेपासून सुरू होतो आणि त्यानंतर कोलाड नाका, वडखळ आणि नागोठणे दिसते. पण, या सर्व क्षेत्रांत रस्त्यावर फक्त खड्डेच दिसत आहेत. वाहनांचे खराब रस्त्यामुळे धिंडवडे निघाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे कामही अजून पूर्ण झालेले नाही आणि रस्त्याचा खर्च मात्र तिपटीने वाढला आहे. मुंबई-गोवा महामार्गासाठी एकूण ९२५ कोटींचा खर्च अपेक्षित होता.

(हेही वाचा Western Expressway : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील प्रवास यंदा खड्ड्याविना)

म्हणून महामार्गाचे काम मंदावले 

या रस्त्याचे काम कनिष्ठ दर्जाचे झाले आहे. या प्रकल्पाकरिता कामे फार विलंबाने होत आहेत आणि रस्त्याच्या कामाचा दर्जाही कंत्राटदारांनी राखलेला नाही. त्यांनी हा महामार्ग उभारण्याची जबाबदारी असलेली संस्था नॅशनल हायवेज ऑथोरिटी ऑफ इंडियाकडे कितीतरी तक्रारी फोनवरून वा ई-मेलने केल्या, पण त्याला काहीच प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा काहीच उपयोग झाला नाही. २०१८ मध्ये वकील ओवेस पेचकर यांनी गणेशोत्सवाच्या आधी उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यासंबंधीच्या पहिल्या सुनावणीमध्ये न्यायाधीशांनी एनएचएआयला आदेश दिले की, मुंबई-गोवा मार्गावरील रस्त्यांवरचे खड्डे तात्पुरते ताबडतोब दुरुस्त करायला हवेत आणि प्रवासी हा रस्ता सुरक्षितपणे वापरू शकतील, असे काम करावे. या घटनेनंतर बांधकाम सुधारले. परंतु, २०२१ ला सरकारकडून रस्ता बांधण्याचे एका मार्गिकेवरील जुने कंत्राट काम रद्द केले आणि त्यामुळे रस्ते कामाला वेग आला होता, ते काम थंडावले. कारण, कंत्राटदारांनी दिल्ली उच्च न्यायालयात जाऊन आधीच्या आदेशावर स्टे आणला. न्यायालयाची कामे अशी रेंगाळत आहेत.

न्यायालयाने फटकारले 

मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरण प्रकल्पातील पनवेल ते इंदापूर (० ते ८४ किमी) या टप्प्याची जबाबदारी असलेल्या महामार्ग प्राधिकरणाला (एनएचएआय) मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले होते. या टप्प्याचे काम कासवगतीने सुरू असल्याचे दिसते. शिवाय (० ते ४२ किमी) या पट्ट्याचे काम एनएचएआयने पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, प्रत्यक्षात तसे काही नाही. याचिकाकर्त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे फोटोंच्या साहाय्याने रस्त्याची सध्याची अवस्था काय आहे, हे दाखविले आहे. एनएचएआयला फटकारत न्यायालयातील प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली होती. उर्वरित महामार्ग मे २०२३ मध्ये पूर्ण होईल, असे एनएचएआयने ठरविले होते. हे सुमारे ४५० किमीचे काम २०११ पासून सुरू आहे. त्यामुळे या रखडपट्टीविरोधात जनहित याचिका करून वकील ओवेस पेचकर यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. एकूण ११ टप्प्यांतील या कामांपैकी दहा टप्प्यांच्या (८४ किमी ते ४५० किमी) कामाची जबाबदारी ही राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे. या संपूर्ण टप्प्यांचे काम मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकिलांनी प्रगती अहवालाद्वारे दिली. त्याच वेळी परशुराम घाटातील खड्डे व चिपळूण येथील उड्डाणपुलाचा प्रश्न पेचकर यांनी मांडला. त्यामुळे पुढील सुनावणीच्या वेळी खंडपीठाने सर्व तपशीलवार माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी, असे निर्देश खंडपीठाने सरकारला दिले.

परशुराम घाटाची समस्या कशी सोडवणार? 

सध्या महामार्गावर मोठ्या संख्येने खड्डे आहेत. तसेच हा महामार्ग अधून मधून रखडलेल्या अवस्थेत अर्थात अर्धवट आहे. त्यामुळे वाहनांना अधून मधून चौपदरी लागतो आणि मध्येच जुना रस्ता लागतो. अशा स्थितीत वाहतूक सुरु असते. ज्याचा नागरिकांना तीव्र त्रास होत आहे. यंदाच्या गणेशोत्वाच्या  तोंडावर या महामार्गाचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. सध्या या मार्गामध्ये परशुराम घाटावरील काम खूपच रेंगाळत चालले आहे. या ठिकाणचा डोंगर मुळातच  भुसभुशीत आहे. त्यामुळे या डोंगरावरील चौपदरीचे काम टिकून राहत नाही. वारंवार या ठिकाणी दरड कोसळत आहे. ही दरड सुरक्षित राहण्यासाठी सिमेंट कॉंक्रेटीकरणाची भिंत उभारली, परंतु आता त्या भिंतीलाही तडे गेल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामात ही नवी समस्या काय वाढून ठेवणार आहे, हे पहावे लागणार आहे.

(हेही वाचा Dabholkar Murder Case : डॉ. दाभोलकर हत्येचा तपास भरकटण्याला त्यांचे कुटुंबीयच जबाबदार ! – सनातन संस्थेचे प्रवक्ता चेतन राजहंस यांचा दावा)

एक तप न संपलेली गोष्ट…

  • ४७१.३३० किमी अंतराचा मुंबई गोवा महामार्ग
  • २०१० पासून कामाला सुरुवात २०२१ पर्यंत १० वर्षांत २४४२ जणांचा मृत्यू
  • ६२.१३ टक्के महामार्गाचे एकूण काम पूर्ण
  • ८४ किमी पळस्पे ते इंदापूर दरम्यानची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची
  • ३८७.३३ किमी इंदापूर ते चिपळूण दरम्यानची जबाबदारी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाची
  • २०१० – ११ मध्ये पळस्पे ते इंदापूर दरम्यानच्या कामाला सुरुवात
  • २०१३ मध्ये झाराप ते पत्रादेवी दरम्यानच्या २१.१६ किमीचे काम पूर्ण
  • २०१६-२०१७ मध्ये इंदापूर ते झाराप दरम्यान केवळ ८४ किमीचे काम पूर्ण
  • ३५५.५७३ किमी इंदापूर ते झाराप दरम्यानचे काम १० पॅकेजच्या अंतर्गत सुरु
  • २०३.८५ किमी काम पूर्ण वाहतुकीसाठी खुला
  • ३४.४५० किमी परशुराम घाटातील केवळ ४०.५० टक्के काम पूर्ण
  • २०२० मध्ये अतिवृष्टी आणि लॉकडाऊनमुळे ९ महिने काम थांबले
  • २०२३ परशुराम घाटातील ७० टक्के काम पूर्ण, पनवेल ते इंदापूर दरम्यानचे ५० टक्के काम पूर्ण
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.