राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीसाठी थेट विधानभवनात, बंद दाराआड झाली चर्चा

99

राज्यात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूर येथे सुरू असून गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या या अधिवेशनात सत्ताधारी-विरोधक सातत्याने आमने-सामने येत आहे. गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांच्यावर विधानसभेत निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर शुक्रवारी या घटनेचा निषेध म्हणून मविआच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज, शुक्रवारी नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी थेट विधान भवनात येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चाही झाली.

(हेही वाचा- … आणि पराभवानंतर खचून जाऊ नका; राज ठाकरेंनी दिला मनसे कार्यकर्त्यांना कानमंत्र)

राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर असताना मनसेच्या पदनियुक्ती सोहळ्यात त्यांनी नवनिर्वाचित सदस्यांना नियुक्तीपत्रे दिली. यानंतर हा मनसेचा पक्षीय कार्यक्रम आटोपून राज ठाकरे नागपूरच्या विधान भवनात पोहोचले. राज ठाकरे विधानभवनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात राज ठाकरेंनी त्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीवेळी मनसे आमदार राजू पाटील, मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश अभ्यंकर हे देखील उपस्थित होते.

बंडखोरी केल्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पहिली भेट झाली होती. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला होता. यानंतर पुन्हा राज ठाकरे हे वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. तर दिवाळीनिमित्त राज ठाकरे यांच्या मनसेने आयोजित केलेल्या दिपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले होते. त्यात आता पुन्हा दोघांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.