क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाला ‘युवकां’चे वावडे; ‘युवा’ खेळाडूंना ५ टक्के आरक्षण नाकारले

राज्यभरातील ३०० हून अधिक युवा खेळाडूंना याचा फटका बसला असून, पोलीस दलात भरती झालेल्या एका खेळाडूची तर नियुक्तीही थांबवण्यात आली आहे.

281
मंत्रालयातून रात्री पावणेदोनच्या सुमारास निघाले बदल्यांचे आदेश; मॅटने दिली तात्काळ स्थगिती
मंत्रालयातून रात्री पावणेदोनच्या सुमारास निघाले बदल्यांचे आदेश; मॅटने दिली तात्काळ स्थगिती

राज्य शासनाच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाला ‘युवकां’चे वावडे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. खेळाडूंना देण्यात येणाऱ्या आरक्षणासंदर्भात या विभागाने २०१६ साली एक शासन आदेश काढला. मात्र, त्यात ‘युवा’ असा उल्लेख नसल्यामुळे खेळाडूंना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण नाकारले जात आहे. राज्यभरातील ३०० हून अधिक युवा खेळाडूंना याचा फटका बसला असून, पोलीस दलात भरती झालेल्या एका खेळाडूची तर नियुक्तीही थांबवण्यात आली आहे.

आकाश पातोडे असे या युवा खेळाडूचे नाव आहे. ७३ व्या युथ बॉईज राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत त्याने तृतीय क्रमांक मिळवला. त्यामुळे नियमानुसार तो ‘क’ आणि ‘ड’ गटातील शासकीय नोकरीसाठी खेळाडू आरक्षणांतर्गत पात्र ठरतो. अमरावती विभागीय कार्यालयाकडून तसे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्याने २०१९ मध्ये पोलीस भरतीसाठी अर्ज केला. शारीरिक, शैक्षणिक पात्रता आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मीरा-भाईंदर आणि वसई पोलीस आयुक्तालयांतंर्गत त्याची पोलीस शिपाई पदासाठी निवड झाली.

(हेही वाचा – Jitendra Awhad : चित्रा वाघ यांचा अपमान करणं पडलं महागात; जितेंद्र आव्हाड अडचणीत)

परंतु, निवड झाल्यानंतर आकाश पातोडे याचा खेळाडू प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अवैध ठरवत नियुक्ती आदेश थांबविण्यात आले आहेत. शासनाच्या जीआरमध्ये ‘युवा’ खेळाडूंविषयी स्पष्टता नसल्यामुळे पोलीस विभागाने हा निर्णय घेतला आहे. असाच प्रकार सांगलीमधील एका युवा खेळाडूसोबत घडला आहे. तसेच राज्यभरातील ३०० हून अधिक युवा खेळाडूंचे अर्ज प्रवेश प्रक्रियेवेळी अवैध ठरवण्यात आले आहेत. शासन निर्णयातील एका चुकीमुळे या खेळाडूंवर अन्याय होत आहे. त्यामुळे शासन निर्णयाचे अवलोकन करून त्यात सुधारणा करावी, अशी मागणी आकाश पातोडे याने केली आहे.

क्रीडा मंत्र्यांनी गांभीर्यपूर्वक लक्ष द्यावे – रणजित सावरकर

शासन निर्णयात युवा खेळाडूंविषयी स्पष्टता नसल्यामुळे टप्प्याटप्प्यावर त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पात्र ठरल्यानंतरही सरकारी नोकरीत खेळाडूंना आरक्षण नाकारणे हे गंभीर आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन याविषयी सातत्याने पाठपुरावा करीत आहे. हा संपूर्ण प्रकार मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घातला आहे. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिल्याची माहिती महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली.

एकाही खेळाडूवर अन्याय होऊ देणार नाही – राहुल शेवाळे

राज्यातील एकाही खेळाडूवर अन्याय होऊ नये, यासाठी शिवसेना पक्ष आणि मी स्वतः प्रयत्न करणार आहे. मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा करून याविषयी योग्य तो तोडगा काढला जाईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

New Project 2023 06 14T155238.030

 

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.