मुख्यमंत्री-पवार यांच्यात पुन्हा एकदा भेट! कोणत्या विषयांवर झाली चर्चा?

महाविकास आघाडीची घडी मोडू नये, म्हणून या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

76

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले स्वबळाचा नारा देत राज्यात काँग्रेसची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली असल्याची माहिती काही सूत्रांकडून मिळत आहे. पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात ही गेल्या काही दिवसांतील तिसरी भेट आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची घडी मोडू नये, म्हणून या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहितीही मिळत आहे.

कोणत्या विषयांवर झाली चर्चा?

काँग्रेस नेते नाना पटोले हे आक्रमक विधाने करत महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. पवार यांनी नुकतीच काँग्रेस नेत्यांकडे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही अनेकदा आपल्या भाषणांमधून नानांच्या स्वबळाच्या ना-यावर भाष्य केलं आहे. त्यामुळे नानांच्या या आक्रमकपणाबाबत या दोन नेत्यांमध्ये काही खलबतं झाल्याची माहिती काही सूत्रांकडून मिळत आहे.

(हेही वाचाः सामांन्यांच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करताय का? पटोलेंचा फडणवीसांना सवाल!)

चौकशी सत्राबाबतही चर्चा

महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन सरकारमधील नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सत्ताधा-यांकडून होत आहे. प्रताप सरनाईक, अनिल देशमुख यांच्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या चौकशीबाबतही पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः सरकारचा आमदारांवर विश्वास नसल्याने अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी घेण्याचा घाट!)

त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्षपद, मतदान प्रक्रिया, कृषी कायदे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीबाबतही चर्चा करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

पवारांनी व्यक्त केली होती नाराजी

तुम्ही जर वेगळं लढण्याचा निर्णय घेतला असेल तर तसं आम्हालाही स्पष्ट सांगा, म्हणजे आम्हालाही तयारीला लागता येईल, असे शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांना खडसावले होते. जर दिल्लीवरुन तसं काही ठरलं असेल तर आम्हाला काही अडचण नाही आणि जर नाना पटोलेंना अधिकार दिले असतील, तर त्याचीही कल्पना आम्हाला द्या. पक्ष वाढवण्याबाबत कोणाचंही दुमत नाही, पण सोबत असलेल्या पक्षांना दुखावणे योग्य नाही, अशा शब्दांत पवारांनी नानांना कानपिचक्या दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.