भाजप-शिंदेंची शिवसेना हिंदुत्ववादी सत्ताधारी, मग मनसे हिंदुंत्ववादी विरोधी पक्ष?

121

भाजपचे नेते राज ठाकरेंना भेटत आहेत. यामागचं कोड उलगडत नाही. कुणी कितीही ह्या भेटी राजकीय नसून सदिच्छा भेटी आहेत असं म्हटलं तरी आतल्याआत काहीतरी शिजतंय हे नक्की. भाजपच्या मदतीने शिंदेंनी उठाव केला हे स्पष्ट आहे. आता भाजपकडे शिंदे नावाचा एक चांगला आणि तगडा साथीदार आहे. मग राज ठाकरेंकडून भापजच्या काय अपेक्षा आहेत?

( हेही वाचा : आता प्रकल्पबाधितांच्या सदनिकांची खरी माहिती येणार समोर : प्रत्येक सदनिकांची होणार संगणीकृत नोंद)

उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. राष्ट्रवादी-बिग्रेड-ठाकरे अशी नवी आघाडी पुढील निवडणूकीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपविरोधी आणि हिंदूविरोधी गटाला आकृष्ट करण्यासाठी ही आघाडी होऊ शकते. यामध्ये कॉंग्रेस एकटी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सत्ता काबीज करता आली नाही तरी मजबूत विरोध पक्ष स्थापन करण्याचा शरद पवारांचा मानस असावा. मग यातूनच लोकसभेत आणि विधानसभेत तिसरी आघाडी निर्माण होऊ शकते. हे झालं स्वयंघोषित पुरोगामी-विश्वाचं गणित.

आता भाजपच्या गोटात काय सुरु आहे याचा आढावा घेऊया. भाजप हा संघाच्या मुशीतून निर्माण झालेला पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचं भावविश्व हिंदू करायचं आहे. वरवर पाहता हा देश स्वयंघोषित पुरोगाम्यांच्या भाषेत सेक्युलर वाटला तरी या देशाचं भावविश्व हिंदू राहणं हे संविधानाच्या दृष्टीकोनातून अत्यंत गरजेचं आहे असं संघाला वाटतं. कारण ज्या देशांच भावविश्व हिंदू असेल त्या देशात सर्व जातीय, सर्व धर्मीय प्रजा सुखी राहिल. याचं उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य.

आता २०२४च्या राज्याच्या निवडणुकीत शिंदे-भाजप युती होणार हे निश्चित आहे. अर्थात या आधी शिंदेंना अनेक लहान-मोठ्या निवडणुकीत आपला प्रभाव दाखवावा लागणार आहे. विशेषतः ठाणे व मुंबईच्या निवडणुकीत मिळणार्‍या जागांवरुन शिंदेंचा प्रभाव लक्षात येणार आहे. आता प्रश्न राहतो तो राज ठाकरेंचा.

राज ठाकरे यांना भाजपचे अनेक नेते भेटत आहेत. वर म्हटल्याप्रमाणे संघाला म्हणजेच भाजपला भारताचं भावविश्व हिंदू करायचं आहे. याची सुरुवात छत्रपतींच्या महाराष्ट्रातून करता येईल. म्हणजे मनसेला मजबूत विरोध पक्ष बनवून इतर पक्षांचं महत्त्व कमी करता येईल. जेणेकरून सत्तेतही हिंदुत्ववादी आणि विरोधातही हिंदुत्ववादी राहतील. हा डाव खरा की खोटा हे येणार्‍या निवडणुकीत आपल्याला कळणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.