Manohar Joshi : महापालिकेतील लिपिक ते लोकसभा अध्यक्ष; असा होता डॉ. मनोहर जोशी यांचा जीवन प्रवास

मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. या संघटनेच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाने प्रभावीत झालेल्या मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी १९६७ साली शिवसेनेत प्रवेश करीत राजकारणात स्वतःला झोकून दिले.

646
  • योगेश त्रिवेदी 

शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर एक वर्षातच १९६७ साली शिवसेनेत दाखल झालेले मनोहर जोशी (Manohar Joshi) यांची कारकीर्द शून्यातून विश्व निर्माण करणारी होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढा, सीमा प्रश्नाचे आंदोलन, शिवसेनेचा निवडणुकीच्या राजकारणातील प्रवेश, मुंबईतील १९९२ची दंगल, युतीची सत्ता अशा शिवसेनेच्या प्रत्येक संघर्षामध्ये मनोहर जोशी चाणक्य म्हणून भूमिका राबवत होते. अशा मनोहर जोशी यांचा जीवन प्रवास हा मुंबई महापालिकेतील लिपिक ते लोकसभा अध्यक्ष असा त्यांचा जीवन प्रवास होता.

रायगड जिल्ह्यातील नांदवी खेडेगावात जन्म 

पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात सरस्वती आणि गजानन जोशी यांच्या कुटुंबात  २ डिसेंबर १९३७ रोजी जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौर पदी विराजमान झालेला तसेच पक्षनिष्ठेचा आदर्श ठेवीत नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री ते लोकसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचणारा अस्सल मराठमोळा ‘चाणक्य’ राजकारणी अशी ओळख महाराष्ट्र नव्हे तर देशपातळीवर निर्माण करणारा राजकारणी म्हणजेच डॉ. मनोहर गजानन जोशी !  मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेची शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी केली. या संघटनेच्या आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्वाने प्रभावीत झालेल्या मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी १९६७ साली शिवसेनेत प्रवेश करीत राजकारणात स्वतःला झोकून दिले.

प्रिन्सिपल मनोहर जोशी बनले 

इयत्ता चौथीपर्यंत नांदवी, पाचवीला महाड, सहावीनंतर मामाकडे पनवेलला, मामांची बदली झाल्यामुळे  गोल्फ मैदानात बॉय ची नोकरी करीत मित्राबरोबर भाड्याच्या घरात राहिले. महाजन बाईंकडे वारावर भोजन केले. मग मुंबईत बहिणीच्या घरी अकरावीच्या शिक्षणासाठी आले. सहस्रबुद्धे क्लासमध्ये शिपायाची नौकरी करुन शिक्षण पूर्ण केले. कला शाखेची पदवी कीर्ती महाविद्यालयातून मिळविली. वयाच्या २७ व्या वर्षी एम. ए. एल. एल. बी. झाले. मुंबई महापालिकेत लिपिकाची नौकरी करता करता १९६४ साली सावित्रीबाई आणि दत्तात्रय हिंगवे यांची कन्या मंगल यांच्या समवेत विवाहबद्ध झाले. मनोहर जोशी यांना उन्मेष हे सुपूत्र तर अस्मिता आणि नम्रता या दोन सुकन्या आहेत. अर्थात, ही मुले राजकारणापासून कोसोमैल दूर आहेत. चिरंजीव उन्मेष हे प्रथितयश ‘कोहिनूर’ उद्योजक आहेत.  मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी उद्योजक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून काही व्यवसाय केले पण दूध, फटाके, हस्तीदंती वस्तू च्या विक्रीमध्ये अपयश आले. मनोहर जोशी यांनी २ डिसेंबर १९६१ रोजी कोहिनूर क्लास सुरु केला. या क्लासचे रुपांतर प्रिन्सिपॉल मनोहर गजानन जोशी यांच्या कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये झाले.

(हेही वाचा Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन)

महापौर बनले  

स्वतः गरीबीची झळ सोसली असल्याने गरीब विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याची दिशा दिली. ‘नोकरी मागणारे नव्हे तर नौकरी देणारे व्हायला हवे’, हा मूलमंत्र मनोहर जोशी यांनी दिला. प्रिन्सिपॉल मनोहर जोशी (Manohar Joshi)  हे १९६७ साली बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळे शिवसेनेत प्रवेश करते झाले आणि मग हां हां म्हणता मनोहर जोशी यांनी संसदीय लोकशाहीच्या एकेक पायऱ्या चढत गेले. ज्या मुंबई महापालिकेच्या इमारतीमध्ये लिपिकाची नौकरी केली, त्याच महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून पाऊल टाकले. १९७६ ते १९७७ या वर्षी मनोहर जोशी हे महापौर झाले. या एका वर्षात त्यांनी ‘सुंदर मुंबई, हरित मुंबई’ ही संकल्पना राबवितांना  ‘एक पाऊल पुढे’ हा स्वच्छतेचा मंत्र दिला. सर्वसाधारणपणे माणूस कचराकुंडीत, कचरा टाकण्यासाठी जातांना लांबूनच कचरा फेकतो आणि मग तो कचरा कुंडीच्या आजूबाजूला पडतो. ‘एक पाऊल’ पुढे टाकले तर तो कचरा बरोबर कुंडीत पडेल, ही संकल्पना यशस्वी झाली.

राज्याचे मुख्यमंत्री बनले 

मुंबई महापालिकेकडून मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी आपला मोर्चा विधानभवनाकडे वळविला आणि महाराष्ट्र विधानपरिषदेवर सदस्य म्हणून तीन वेळा निवडून गेले. मनोहर जोशी, प्रमोद नवलकर आणि सुधीर जोशी ही त्रिमूर्ती इथून पुढे महाराष्ट्रात गाजू लागली. भारतीय जनता पक्षाचे नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समवेत शिवसेना भाजप ही हिंदुत्वाच्या आधारावरची युती घडवून आणली. त्यामुळे १९९० साली शिवसेनेचे ५२ आणि भारतीय जनता पक्षाचे ४२ आमदार विधानसभेत निवडून आले. यावेळी मनोहर जोशी यांची बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते म्हणून निवड केली. १९९१ साली छगन भुजबळ यांच्या समवेत १५ आमदारांनी शिवसेना सोडून काँग्रेस प्रवेश केला, त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचे विरोधी पक्षनेते पद भारतीय जनता पक्षाच्या गोपीनाथ मुंडे यांच्याकडे गेले. १९९०-१९९१ हे एक वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेल्या मनोहर जोशी यांना मुंबई उच्च न्यायालयातील निकाल त्यांच्या विरोधात गेल्यामुळे आमदारकी सोडावी लागली.  १९९५ साली पुन्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरली आणि १९९० साली थोडक्यात हुकलेली युतीची सत्ता १९९५ साली आली. १४ मार्च १९९५ रोजी अरबी समुद्राच्या आणि  विराट जनसागराच्या साक्षीने अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवतीर्थावर मनोहर गजानन जोशी यांनी मुख्यमंत्री तर गोपीनाथ पांडुरंग मुंडे यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

राज्याचा कारभार मराठी भाषेत सुरु केला 

महाराष्ट्रात १९७८ नंतर पुन्हा एकदा बिगर काँग्रेसचे शिवशाही सरकार आले. संयुक्त महाराष्ट्र जरी १ मे १९६० रोजी स्थापन झाला असला तरी महाराष्ट्रातील प्रशासन चालविणाऱ्या मंत्रालयात कामकाजाची भाषा म्हणून ‘मराठी’ भाषेला स्थान मिळाले नव्हते. राज्याचा प्रत्येक मुख्यसचिव मराठी भाषेत कामकाज करण्यासाठी मुदतवाढ मागत होते आणि दरवेळी ती मिळत होती. परंतु अशीच एक नस्ती (फाईल) मनोहर जोशी यांच्यासमोर येताच ती त्यांनी भिरकावून देत १ मे १९९५ पासून मराठी भाषेत कामकाज सुरु झालेच पाहिजे, असा सुस्पष्ट आदेश दिला. जोशी-मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने ‘बॉम्बे’ चे ‘मुंबई’ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मंजूर करण्यात आला.

(हेही वाचा Sharad Pawar : शरद पवार गटाला मिळाले तुतारी निवडणूक चिन्ह)

राज्याच्या विकासाला नवी दाखवली 

१९७४ साली कृष्णा खोऱ्याचे ५४० टीएमसी पाणी अडविण्यासाठी करार होऊनही १९९५ पर्यंत हा करार प्रत्यक्षपणे पुढे सरकू शकला नव्हता. पण जोशी-मुंडे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाचहजार कोटी रुपयांचे रोखे काढून स्वतंत्र कृष्णा खोरे महामंडळ स्थापन करुन पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा सुजलाम सुफलाम करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल टाकले. मुंबई मध्ये पंचावन्न उड्डाणपूल, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, वांद्रे वरळी सागरी सेतू असे अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प जोशी-मुंडे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मार्गी लावतांना मुंबईतील पायाभूत सुविधांचा पाया रचला. ‘महापौर परिषद’ संबंधी निर्णय घेऊन राज्यातील महानगरपालिकेच्या महापौरांच्या अधिकाराचा एक चांगला निर्णय घेतला. गोरगरिबांच्या भूकेची काळजी घेतली आणि एक रुपयात झुणका भाकर ही योजना अंमलात आणली. तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनाही या झुणका भाकरीचा स्वाद मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी चाखायला लावला होता आणि त्यांनाही तो आवडला होता. मनोहर जोशी हे हाडाचे शिक्षक असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत ‘वर्षा’ या निवासस्थानी प्रौढ साक्षरतेचे वर्गही भरविले इतकेच नव्हे तर शाळा/ महाविद्यालयांच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी चक्क विद्यार्थ्यांचे वर्गही घेतले. मुख्यमंत्री पदावर असतांना डॉ. मनोहर जोशी यांच्या द्रुष्टीने आणखी एक महत्वपूर्ण घटना घडली.

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आणि दिल्लीच्या राजकारणात सक्रिय 

१९९९ पर्यंत मनोहर जोशी (Manohar Joshi) यांनी तारेवरची कसरत करीत मुख्यमंत्री म्हणून चार वर्षे कारकीर्द यशस्वी करुन दाखविली. क्रिकेट वरील प्रेमामुळे मनोहर जोशी यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषविले. शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे १९९२-९३ च्या मुंबईतील दंगल आणि बॉम्बस्फोट याची चौकशी करणाऱ्या न्या. बी. एन. श्रीकृष्ण यांचा अहवाल विधिमंडळाच्या सभागृहात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी फाडून टाकीत अक्षरशः फेटाळून लावला. अयोध्येतील राममंदिर प्रकरणात सुद्धा मनोहर जोशी  उत्तर प्रदेश मध्ये पोहोचले होते. महाराष्ट्रातील राजकीय चौकट मनोहर जोशी यांच्या प्रभावशाली राजकारणी नेत्याला अपुरी पडू लागली आणि राष्ट्रीय पातळीवरचे राजकारण त्यांना खुणावू लागले. त्याप्रमाणे १९९९ साली मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर  त्यांना पत्रकारांनी विचारले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आपण कारण विचारणार नाही कां ? त्यावर पटकन उत्तर देताना मनोहर जोशी म्हणाले की, मला जेंव्हा बाळासाहेबांनी मुख्यमंत्री केले तेंव्हा मी त्यांना, “साहेब, मला मुख्यमंत्री कां करीत आहात ? असे विचारले नव्हते. तेंव्हा त्यांनी पद दिले आणि त्यांनी काढून घेतले, यात विशेष काय ? असा प्रतिसवाल केला.

लोकसभा अध्यक्ष बनले 

इतकेच नव्हे तर राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केल्यानंतर तत्काळ मनोहर जोशी (Manohar Joshi) हे पत्नी अनघा यांच्यासमवेत टँक्सीने वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडून दादरच्या ओशियाना या निवासस्थानी निघून आले. मनोहर जोशी यांना १९९९ साली उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून दिल्लीच्या राजकारणात जाण्याची संधी मिळाली. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात आधी अवजड उद्योग मंत्री म्हणून मनोहर जोशी यांची वर्णी लागली. त्यांनी या खात्याला वेगळे महत्त्व प्राप्त करून देतांनाच हे खाते दुय्यम, कमी महत्त्वाचे नाही, हे दाखवून दिले. दुर्दैवाने लोकसभेचे अध्यक्ष जी. एम. सी. बालयोगी यांचे निधन झाले. त्यानंतर प्रमोद महाजन, अटलबिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांनी सल्ला मसलत करुन मनोहर जोशी यांना थेट लोकसभेच्या अध्यक्षपदी संसदीय लोकशाहीच्या सर्वोच्च स्थानी बिनविरोध विराजमान केले.

संसदेत वीर सावरकर यांचा सन्मान केला 

आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत डॉ. मनोहर जोशी यांनी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चित्रकर्त्या चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केलेले तैलचित्र लावून एक ऐतिहासिक भूमिका पार पाडली. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे राष्ट्रपती आणि अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक सोहोळ्यास उपस्थित होते. संसदीय लोकशाही मधील राजशिष्टाचाराप्रमाणे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या नंतरचे पद मनोहर जोशी यांना प्राप्त झाले. यावेळी महाराष्ट्र विधिमंडळात मनोहर जोशी यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.