इंदापूर येथील मालोजीराजेंच्या गढीचे होणार संवर्धन – मंगलप्रभात लोढा

123
हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्री मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजळा देण्यासाठी, पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गढीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे २ कोटींची तरतूद करण्यात येईल. तसेच या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी बुधवारी विधानसभेतील लक्षवेधी प्रश्नाच्या उत्तरादरम्यान केली.
माजी राज्यमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी याबाबत विधानसभेत, लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा श्री मालोजीराजे यांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात वास्तव्य केलेला भुईकोट किल्ला (जुनी तहशील कचेरी) हा, प्रशासकीय दृष्टीने महसूल विभागाकडे दप्तरी नोंद आहे. महसूल विभागाच्या नोंदीमध्ये मालोजीराजांच्या इतिहासाच्या बाबींचा उल्लेख आहे. इतिहासाची साक्ष असणाऱ्या या ऐतिहासिक जुनी तहशील कचेरी म्हणजेच मालोजीराजे यांच्या गढीचे संवर्धन करून जुने बुरुज गाव वेस बुधरे यांचे पुनर्जीवन करून, या कचेरीच्या जागेतच छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे स्मारक उभारावे. तसेच श्री मालोजीराजेंच्या पादुकासाठीही दगडी मूळ स्वरूपाचा चबुतरा उभारून, त्यांचे जीवनचरित्र महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी पर्यटन विभागाकडून प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
याविषयी राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सकारात्मक भूमिका घेत या गढीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे २ कोटींचे प्रावधान करण्यात येईल. तसेच २ महिन्यांच्या आत गढीवर बैठक घेऊन, हा विषय तडीस नेण्यात येईल, असे स्पष्ट केले. तसेच हे स्थळ ७ दिवसांच्या आत पर्यटनस्थळ म्हणून, घोषित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.