Lok Sabha Election 2024 :  उद्धव ठाकरे विदर्भातील जागा काँग्रेसला विकतात; शिंदे गटाच्या आमदाराचा आरोप 

143

शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पूर्वी भाजपला सीट विकायचे. आता काँग्रेसला विकतात. विदर्भातील जागा (Lok Sabha Election 2024)  विकून मुंबईचे भले करून घेतात. हा शिवसैनिकांवरील अन्याय आहे, असा आरोप विदर्भातील शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर निशाणा साधताना केला आहे.

लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील मविआतील जागावाटपाला वेग आला आहे. त्यात विविध पक्षातील इच्छुक उमेदवारांनी बंडाची भाषा केल्यामुळे पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ठाकरे गटाकडून गत अनेक वर्षांपासून विदर्भावर अन्याय सुरू आहे. आम्हाला त्याचा अनेकदा अनुभव आला आहे. पूर्वी शिवसेनेची भाजपसोबत युती होती. तेव्हा शिवसेना भाजप म्हणेल ती सीट द्यायची आणि घ्यायची.

आताही आपण पाहिले तर, रामटेक ही शिवसेनेची पारंपरिक सीट आहे. शिवसैनिकांना न्याय देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी ही जागा लढवण्याची गरज होती. पण त्यांनी रामटेकची जागा काँग्रेसला दिली. पूर्व विदर्भातही त्यांनी आपल्याकडे एकही जागा ठेवली नाही. सर्व सीट देऊन टाकल्या, असे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले आहे.

(हेही वाचा Swatantrya Veer Savarkar : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटात ऐरोलीतील 24 वर्षीय ऐश्वर्याचाही सहभाग)

ठाकरे केवळ मुंबईचे भले करतात

2019 च्या निवडणुकीतही आम्हाला उद्धव ठाकरे यांचा असाच अनुभव आला. त्यांनी आम्हाला एकही सीट ठेवली नाही. त्यांनी स्वतःकडे ठेवलेल्या 1-2 जागा एक्सपायरी डेटच्या होत्या. ते पूर्वी भाजप जे म्हणेल ते करायचे. आता काँग्रेस जे सांगते, ते करतात. हाच उद्धव ठाकरे यांचा खरा चेहरा आहे. उद्धव ठाकरे पूर्वी भाजपला सीट विकायचे, आता (Lok Sabha Election 2024) काँग्रेसला विकतात. त्या मोबदल्यात मुंबईचे भले करतात. मुंबईमध्ये त्यांना हवी ती सीट मागून घेतात. हा शिवसैनिकांवरील अन्याय आहे, असेही नरेंद्र भोंडेकर यावेळी बोलताना म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.