Lok Sabha Election 2024 : गोपाळ शेट्टींना हॅटट्रिक करण्याची संधी मिळाली नाही, आता राज्यातील राजकारणात उतरवणार?

736
Lok Sabha Election 2024: गोपाळ शेट्टींना हॅटट्रिक करण्याची संधी मिळाली नाही, आता राज्यातील राजकारणात उतरवणार?
Lok Sabha Election 2024: गोपाळ शेट्टींना हॅटट्रिक करण्याची संधी मिळाली नाही, आता राज्यातील राजकारणात उतरवणार?

>> विशेष प्रतिनिधी, मुंबई

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election 2024) मागील दोन टर्म खासदार असलेल्या गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कापून त्यांच्या ऐवजी माजी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर नवीन चेहरा दिला जाणार असल्याची चर्चा होती आणि या जागी पियुष गोयल यांचे नावही चर्चेत होते. त्यामुळे गोयल यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे गोपाळ शेट्टी यांना विधानसभा निवडणुकीत उतरवून मालाडमधून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. या लोकसभा मतदारसंघातील मालाड विधानसभा मतदारसंघातून भाजपाला कायमच हुलकावणी मिळत आली आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेट्टी यांना मालाडमधून उमेदवारी देत या मतदारसंघात भाजपचा आमदार निवडून आणण्याचा विचार असल्याचे बोलले जात आहे.

गोयल यांच्या नावाची अधिकृत घोषणा
उत्तर मुंबई मतदारसंघात २०१४च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालिन आमदार असलेल्या गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी देण्यात आाली. त्यांनी २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांचा पराभव केला. तेव्हापासून सलग दुसऱ्यांदा गोपाळ शेट्टी हे खासदार म्हणून निवडून आले असून ते हॅटट्रीक साधणार असा अंदाज होता. विशेष म्हणजे १९८९ ते १९९९ मध्ये ५ वेळा झालेल्या निवडणुकीत भाजपाचे राम नाईक हे निवडून आले होते आणि त्यानंतर २००४मध्ये काँग्रेसचे गोविंदा आणि त्यानंतर २००९मध्ये संजय निरुपम हे निवडून आले होते. त्यानंतर हा मतदारसंघ भाजपाकडेच राहिला आहे, परंतु मागील काही दिवसांपासून या मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांना पुन्हा दिल्लीत न पाठवता दुसऱ्या उमेदवाराच्या नावाची चर्चा होती. यामध्ये माजी मंत्री विनोद तावडे, पियुष गोयल तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची चर्चा होती. त्यातील पियुष गोयल यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भाजपाने केलेल्या सर्वेमध्ये गोपाळ शेट्टी यांच्या विरोधातील मते समोर आली होती. वातावरण त्यांच्या विरोधातील असल्यानेच गोपाळ शेट्टी यांचा पत्ता कापला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती.

(हेही पहा – Electoral Bond: संकेतस्थळावर निवडणूक रोख्यांचा सर्व तपशील जाहीर करणार, मुख्य निवडणूक आयुक्तांचे महत्त्वाचे वक्तव्य)

सर्वात सुरक्षित मतदारसंघ
मागील लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना ७ लाख ०६ हजार ६७८ मते मिळाली होती, तर काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर यांना २ लाख ४१ हजार ४३१ मते मिळाली होती. त्यामुळे तब्बल पावणे पाच लाख मतांच्या फरकाने गोपाळ शेट्टी यांचा विजय झाला होता. मुंबईतील भाजपाचा हा सर्वात सुरक्षित असा हा मतदारसंघ मानला जात आहे. या मतदारसंघात बोरिवली, दहिसर, कांदिवली पूर्व आणि चारकोप या ४ मतदारसंघात भाजपाचे आमदार असून मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे प्रकाश सुर्वे हे आमदार असल्याने ६ पैकी ५ मतदारसंघात भाजपा आणि शिवसेनेचे बळ आहे. त्यामुळे एकमेव मालाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे अस्लम शेख हे आमदार आहेत. आजवर मालाडची मते घेण्यातही गोपाळ शेट्टी यांनी किमया साधली होती आणि मागील निवडणुकीत काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनाही या मतदारसंघातून फारसे मतदान झाले नव्हते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.