Lok Sabha Election 2024: चंद्रकांत पाटलांनी फेटाळले एक्झिट पोल्सचे अंदाज, सेफॉलॉजीचा संदर्भ देत म्हणाले…

महाराष्ट्रात दोन्ही बाजूंकडून ४५ हून अधिक जागा मिळतील, असा दावा करण्यात आला होता.

169
Lok Sabha Election 2024: चंद्रकांत पाटलांनी फेटाळले एक्झिट पोल्सचे अंदाज, सेफॉलॉजीचा संदर्भ देत म्हणाले...

देशभरात लोकसभा निवडणुकीसाठीच्या सातही टप्प्यांचं मतदान पूर्ण झालं आहे. त्यापाठोपाठ शनिवारी सायंकाळी एक्झिट पोल्सचेही अंदाज बाहेर आले आहेत. त्यानुसार, देशभरात एनडीएला ३०० हून अधिक जागांचे अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनं वर्तवले आहेत; पण महाराष्ट्रात मात्र महायुतीला दावे केल्याप्रमाणे यश मिळत नसल्याचे निष्कर्ष एक्झिट पोल्समधून समोर आले आहेत. विशेष म्हणजे काही एक्झिट पोल्सनं उद्धव ठाकरे गट राज्यातला दुसरा मोठा पक्ष ठरेल, असाही अंदाज वर्तवला आहे. यावरून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी आपण स्वत: सेफॉलॉजीचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले असल्याचा दावा केला आहे.

महाराष्ट्रासाठी Exit Poll चे अंदाज ?
महाराष्ट्रात दोन्ही बाजूंकडून ४५ हून अधिक जागा मिळतील, असा दावा करण्यात आला होता. देशभरात एनडीएच्या बाजूने मतदारांनी कौल दिल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला असला, तरी महाराष्ट्रात मात्र चित्र वेगळं असल्याचं दिसून आलं आहे. एक्झिट पोल्सनुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी व महायुती यांना प्रत्येकी सरासरी २० ते २३ जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यातही भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार असल्या, तरी एकनाथ शिंदे गट व अजित पवार गटासाठी एक्झिट पोल्सचे अंदाज फारसे समाधानकारक ठरले नाहीत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे गटासाठी ९ ते १० जागांचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामुळे राजकीय विश्लेषकांसाठी हे अंदाज उत्सुकतेचा विषय ठरले आहेत.

(हेही वाचा – Mumbai Rain: मुंबईमध्ये कधी होणार पावसाचं आगमन? हवामान खात्याने तारिख सांगितली…)

चंद्रकांत पाटलांना अंदाज मान्य नाहीत!
देशभरातील एक्झिट पोल्सच्या अंदाजांमुळे पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार, असा दावा एकीकडे करताना महाराष्ट्रात मात्र एक्झिट पोल्सचे अंदाज खोटे ठरतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ”देशभरातले सगळे कल एकच गोष्ट दाखवतायत की, पुन्हा एकदा मोदी देशाचे पंतप्रधान होणार आहेत. त्यामुळे एक्झिट पोल्सवरून मतं व्यक्त करणं बरोबर नसलं, तरी सगळ्या एक्झिट पोलमध्ये एकच गोष्ट दिसणं आनंददायी आहे”, असं चंद्रकांत पाटील शनिवारी माध्यमांना म्हणाले.

दरम्यान, महाराष्ट्रातील एक्झिट पोलबाबत त्यांनी वेगळी भूमिका मांडली. ”राज्यात वेगवेगळे एक्झिट पोल आहेत. त्यातही एक दिशा अशी दिसतेय की ३५ च्या पुढे नक्कीच महायुती जाईल. एक्झिट पोल्सच्या अंदाजांवर काही बोलण्यात अर्थ नाही. प्रत्यक्षात ४ तारखेला निकाल हाती येतील तेव्हा बोलू. सोलापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागांसाठी मी पूर्ण ठाम आहे. आता हे कल दाखवत असले, तरी महायुतीला महाराष्ट्रात खूर चांगल्या जागा मिळणार आहेत”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, रविवारी पहाटे आपल्या अंदाजात आणखी ३ जागांची भर टाकत महायुतीला ३८ जागा मिळतील, असा अंदाज पाटील यांनी वर्तवला आहे. ”महाराष्ट्रात महायुतीला ३८च्या खाली एकही जागा मिळू शकत नाही. काल रात्री मी ३५ म्हणत होतो. पण रात्री उशीरापर्यंत मी खूप प्रकारची कामं केली. परमेश्वराला प्रार्थना केली की इतके परिश्रम करूनही इतक्या कमी जागा नको. इतर गणितंही मांडली. सेफॉलॉजीच्या आधारे अभ्यास केला. माझा निष्कर्ष असा आहे की महायुतीला ३८ च्या खाली एकही जागा मिळणार नाही. ३८ ते ४१ यादरम्यान त्या जागा असतील. त्यातून सर्व कार्यकर्त्यांना काम करण्याचं समाधान मिळेल”, असं ते म्हणाले.

मविआलाही ३५-४० जागांचा विश्वास
चंद्रकांत पाटलांप्रमाणेच काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही दावा केला आहे. “जनतेच्या मनातलं अजूनही एक्झिट पोलमध्ये दिसत नाही. जनतेच्या मनात मोदी व भाजपाच्या विरोधातला राग होता. ४ तारखेला इंडिया आघाडीचं सरकार बनताना दिसेल. महाराष्ट्रात ३५ ते ४० च्या घरात मविआला जागा मिळताना दिसतील”, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.