सदावर्तेंना ५ दिवसांची कोल्हापूर पोलिसांची कोठडी

103
संपकरी एसटी कामगारांचे नेतृत्व करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. त्यानंतर मात्र राज्यातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात सदावर्ते यांच्याविरोधात वेगवेगळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. ज्यामुळे सदावर्ते यांची रवानगी विविध पोलीस ठाण्यात होत आहे. त्याप्रमाणे कोल्हापूर पोलिसांनी सदावर्ते यांना अटक केली, त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायदंडाधिकारी व्ही.पी. गायकवाड यांनी २१ एप्रिल रोजी ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सदावर्ते यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रहावे लागणार आहे.

मराठा आरक्षणाच्या विरोधात चिथावणीखोर भाष्य केल्याचा आरोप 

मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात सदावर्ते यांनी सतत चिथावणीखोर वक्तव्ये केली. त्यामुळे सकल मराठा मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांनी अ‍ॅड. सदावर्ते यांच्याविरोधात शाहूपुरी पोलिसांत तक्रार केली होती. ॲड. सदावर्ते यांच्या विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता. सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करून मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शिवाय मराठा आणि मागासवर्गीय समाज यांच्या तेढ निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. चिथावणीखोर वक्तव्य करून सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करण्याचा सदावर्तेंचा प्रयत्न सामाजिक सलोख्याला बाधा निर्माण करणारा आहे, असेही दिलीप पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे. सरकारी वकील आम्रपाली कस्तुरे व फिर्यादी दिलीप पाटील यांचे वकील ॲड. शिवाजीराव राणे, सदावर्ते यांच्या बाजूने ॲड. पीटर बारदेस्कर यांनी युक्‍तीवाद केला. एक तासाहून अधिक युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.