२०२४ ला कर्जत-जामखेडमध्ये पुन्हा कमळ फुलेल – राम शिंदे

115
गेल्या अडीच वर्षांत रोहित पवारांनी कर्जत-जामखेडच्या मतदारांना केवळ स्वप्ने दाखवली. ठोस असे एकही विकासकाम त्यांना करता आलेले नाही. त्यामुळे २०२४ ला या मतदारसंघात पुन्हा कमळ फुलेल, असा विश्वास माजी गृहराज्यमंत्री आणि भाजपाचे आमदार राम शिंदे यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना व्यक्त केला.
राम शिंदे यांनी सोमवारी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या टीमशी संवाद साधताना ते म्हणाले, २०१९ ला माझा पराभव झाला, तो एक योगायोग होता. मात्र, कर्जत-जामखेडच्या विद्यमान आमदाराने गेल्या अडीच तीन वर्षांत जनतेला जी स्वप्ने दाखवली, ती दिवास्वप्ने ठरली. आश्वासनांची खैरात करण्यात आली; पण ती पूर्ण करता आली नाहीत. मतदारसंघात ठोस असे एकही काम झालेले नाही. त्यामुळे कर्जत-जामखेडचा अभिमान, स्वाभिमान गहाण ठेवल्याची भावना सर्वसामान्य मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.
जी काही प्रलंबित होती, ती मार्गी लावण्याचे प्रयत्न आता सत्ताबदल झाल्यानंतर मी सुरू केले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. परिणामी, २०१९ ला भाजपाची २५ वर्षांची खंडित झालेली परंपरा २०२४ पासून पुन्हा अविरत सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अहमदनगरचे नामांतर होणार

अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची सर्वसमावेशक मागणी आहे. कारण अहिल्यादेवींचा जन्म या जिल्ह्यात झाला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामांतर केले. नगर संदर्भात राज्य सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल, अशी अपेक्षा असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.